Mahakumbh 2025 महाकुंभमेळ्यात आजच्या मौनी अमावस्येच्या अमृतस्नानासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे बुधवारी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या घटनेत 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आली नव्हती. आता अखेर घटनेनंतर सुमारे 20 तासांनी प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जारी केली आहे. संगम घाटाजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत.
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली आहे. तर इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तिंघाची तर 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत अशी माहिती महाकुंभचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली आहे. जखमींना प्रयागराजमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वांवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्य सरकारकडून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन आयोगाकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच ही समिती निर्धारित वेळेत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.