वनमंत्री व पालघर जिह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मिंध्यांना ठाण्यात थेट आव्हान दिले आहे. वास्तविक पालघर जिह्यात त्यांनी जनता दरबार घेणे अपेक्षित आहे. पण ठाण्याचा कारभार सुरळीत करण्यासाठी आपण गडकरी रंगायतनमध्ये लवकरच जनता दरबार भरवणार असल्याची घोषणाच आज नाईक यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मिंधे व नाईक यांच्यात जुंपण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिह्याचे पालकमंत्री आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा पालकमंत्रीपद भूषवले, पण कधीही ठाण्यात जनता दरबार भरवला नाही. हीच बाब लक्षात घेत गणेश नाईक यांनी थेट ठाण्यात येऊन मिंध्यांनाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली आहे. दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही. कुणाचा अपमान करू नका. जनतेची कामे करा, असे कार्यकर्त्यांना सांगताना एकनाथ शिंदेंना टोले लगावले.
राजकारणाचा स्तर घसरल्याची कबुली
सध्याच्या राजकारणाचा स्तर घसरला असून कुणाचाही अपप्रचार किंवा कुणाही विरोधात अनुद्गार आपण काढणार नाही. मात्र जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा जनता दरबार घेणार असल्याचे गणेश नाईक यांनी आवर्जून सांगितले.