पनवेलमधील हिरानंदानी सोसायटीत राहणाऱ्या मनोज गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही दडपशाही सुरू आहे. दोन टक्क्यांची मराठी माणसं तुम्ही… तुमची हिरानंदानीमध्ये राहण्याची लायकी नाही अशी मुजोरी सोसायटीची महिला चेअरमन वसुंधरा शर्मा हिने केली आहे. इथून निघून जा असे सांगत शर्मा हिने गायकवाड यांना शिवीगाळ केली.
पनवेलमधील भोकरपाडा भागात हिरानंदानी सोसायटी आहे. या सोसायटीत गायकवाड कुटुंबीय भाडय़ाने राहतात. त्यांचे कॉण्ट्रक्ट संपल्यानंतर ते दुसऱ्या रूमची शोधाशोध करत असल्याने त्यासंदर्भात त्यांनी घरमालकाला कळवले होते. गायकवाड यांच्या कुटुंबात लहान मूल असल्याने घरमालकांनी दुसरे घर मिळेपर्यंत राहण्याची परवानगी दिली होती. मात्र या सोसायटीची महिला चेअरमन वसुंधरा शर्मा हिने गायकवाड यांना दमदाटी करत ही रूम सोडून निघून जा असे सांगत प्रचंड गोंधळ घातला. आम्हाला पाच महिन्यांचे बाळ आहे, आम्ही बाळाला घेऊन कुठे जाऊ? असा सवाल गायकवाड यांच्या पत्नीने केला तेव्हा तुमच्या मराठी माणसांची हिरानंदानीत राहण्याची लायकी नाही अशी मुजोरीही तिने करत गायकवाड यांना शिवीगाळ केली.
इतर मराठी कुटुंबांचाही छळ
हिरानंदानी सोसायटीत राहणाऱ्या इतर मराठी कुटुंबांचाही चेअरमन वसुंधरा शर्मा हिने छळ केल्याच्या तक्रारी समोर आल्या. याचा खडसावून जाब विचारल्यानंतर वसुंधरा शर्मा हिने सर्वांची माफी मागितली आणि यापुढे एकही मराठी कुटुंब किंवा भाडेकरूंना त्रास देणार नाही याची कबुलीही तिने दिली.
– या वादानंतर मनोज गायकवाड यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.