हिंदुस्थान कंपोजिट्सच्या 1100 कामगारांना थकीत डीएचे पैसे मिळणार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम

हिंदुस्थान कंपोजिट्स लिमिटेडमधील (फेरोडो) हजारो कामगारांच्या 30 वर्षांच्या लढय़ाला अखेर यश आले आहे. घाटकोपर पश्चिम येथील व आता बंद असलेल्या या कंपनीतील 1100 कामगारांना थकलेला महागाई भत्ता (डीए) मिळणार आहे. या डीएचे वितरण उद्या, ‘मातोश्री’ निवासस्थानी  सकाळी 11 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काही कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान कंपोजिट्स लिमिटेडमधील कामगारांचा थकीत डीएचा लढा 30 वर्षे औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालयात चालूनही यावर काही निर्णय होत नव्हता. शेवटी संतप्त कामगारांनी हा लढा कोर्टाबाहेर सोडवावा अशी भूमिका विक्रोळीच्या बैठकीत घेतली. कामगारांना थकीत डीए मिळावा यासाठी माजी उपविभागप्रमुख नंदू आंबोकर यांच्यासह सुधीर पाटील, अप्पा चव्हाण, एल. जी. नाईक यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना लोहमार्ग आयुक्त रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांची साथ लाभली. या पार्श्वभूमीवर विक्रोळीच्या संदेश विद्यालयात हिंदुस्थान कंपोजिट्सच्या कामगारांची एक बैठक झाली. त्यानंतर आंबोकर यांच्यासह सर्व प्रयत्नकारांनी हिंदुस्थान कंपोजिट्सच्या मालकांशी चर्चा केली. त्यावेळी मालकही कोर्टाबाहेर यावर तोडगा काढण्यात तयार झाले. त्यानुसार सुवर्णमध्य काढून प्रत्येक कामगाराला आणि मृत कामगारांच्या वारसाला डीएची रक्कम त्यांनी केलेल्या सेवा वर्षानुसार मिळणार आहे. 30 वर्षांच्या लढय़ानंतर हे पैसे मिळत आहे, ही आम्हा सर्व कामगारांच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची गोष्ट आहे, असे नंदू आंबोकर यांनी सांगितले.

उद्या सकाळी  ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता घाटकोपर पश्चिम येथील एसएनडीटी कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात कामगारांना धनादेशाचे वितरण आमदार सुनील राऊत, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, मुंबईचे सहपोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी महापौर महादेव देवळे, हिंदुस्थान कंपोजिटसचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार चौधरी, माजी नगरसेवक सुनील भालेराव हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना समन्वयक रवींद्र कोठावदे, शिवसेना उपविभागप्रमुख विजय पडवळ, शाखाप्रमुख नीलेश पोहरकर यांनी केले आहे. या कार्यक्रमास आमदार सुनील राऊत यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.