![ST BUS Fare Hike](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/ST-BUS-Fare-Hike-696x447.jpg)
कोणतीही पूर्वसूचना न देता आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही ठराव मंजूर न होता एसटीच्या तिकीटात तब्बल 14.95 टक्क्यांची दरवाढ करणाऱ्या राज्यातील महायुती सरकारविरोधात प्रवाशांच्या संतापाचा भडका उडाला. राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. ‘एक दो… एक दो… सरकार को फेक दो…’, ‘जनतेचा खिसा कापणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो’, ‘रद्द करा रद्द करा… भाडेवाढ रद्द करा…’ अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी चांद्यापासून बांद्यापर्यंतचे एसटी डेपो दणाणून सोडले. नागरिकांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली, परंतु जोपर्यंत भाडेवाढ रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.
बीड
शहरातील बसस्थानकासमोर शिवसैनिकांनी चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुतेंसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक सामील झाले होते. शासनाने दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुखांनी दिला आहे.
नाशिक
एसटीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मंगळवारी शिवसेनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन केले. एक तास रास्ता रोको करीत सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. जनहितविरोधी निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हाय.. हाय..’, ‘महायुती सरकारचा धिक्कार असो’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. एक तास रास्ता रोको करण्यात आला. दरवाढ त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा विभाग नियंत्रक अरुण सिया यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. या आंदोलनात सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, केशव पोरजे, मामा राजवाडे, महेश बडवे, सचिन मराठे, भैय्या मणियार, संजय चव्हाण, काकासाहेब देशमुख, राहुल ताजनपुरे, राहुल दराडे, बाळासाहेब कोकणे, शैलेश सूर्यवंशी, देवा जाधव, वैभव ठाकरे, सचिन बांडे, मसूद जिलानी, गोकुळ मोजाड, दीपक गायधनी, प्रशांत कोकणे, मुकुंद पाळधे, साहेबराव चौधरी, सुनील जाधव, यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.
पुणे
एसटीच्या भाडेदरात 15 टक्के वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापणाऱ्या महायुती सरकारविरोधात शिवसेनेने मंगळवारी सकाळी स्वारगेट डेपोसमोर चक्का जाम आंदोलन केले. डेपोतून बाहेर पडणाऱ्या गाडय़ा अडवीत, टपांवर चढून कार्यकर्त्यांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. महायुती सरकार, परिवहन मंत्री यांच्याविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला संपर्क संघटिका स्नेहल आंबेकर, सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे, युवासेनाअधिकारी राम थरकुडे, निकिता मारटकर, परेश खांडके, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, समीर तुपे, आबा निकम, प्रशांत राणे, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, किशोर रजपूत, उमेश वाघ, संजय वाल्हेकर, रमेश क्षीरसागर, सचिन पासलकर, निलेश वाघमारे, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विभागप्रमुख सूरज लोखंडे उपस्थित होते.
कोकण
एसटी बस स्थानकात शिवसेनेच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध असो’ आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हातात असलेले फलक लक्षवेधी होते. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, जयभारत पालव, शहरप्रमुख संतोष शिरसाट, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, नगरसेवक उदय मांजरेकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, सचिन काळप, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, महिला आघाडी तालुका संघटक स्नेहा दळवी, जान्हवी पालव, आदिती राऊत, गुरू गडकर, अमित राणे, प्रसाद गावडे आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.