अटल सेतूवर आणखी वर्षभर 250 रुपये टोल

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सुरू असलेला 250 रुपये टोल आणखी वर्षभर कायम ठेवण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उभारण्यात आलेला 22 किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प 13 जानेवारी 2024 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अटल सेतूवरून प्रवास करणाऱया वाहनांकडून प्रस्तावित केलेल्या दराच्या 50 टक्के सवलतीच्या दराने 250 रुपये टोल घेतला जातो. 4 जानेवारी 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत तो टोल ठरवण्यात आला होता. एक वर्षानंतर टोलच्या रकमेचा आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत तितकाच टोल घेण्याचा निर्णय घेण्यात आला.