मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आठव्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी देशमुख कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन दोन घोट पाणी घेतले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची प्रकृती अजून खालावली असून त्यांचा आवाज खोल गेला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आठव्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मयत संतोष देशमुख यांच्या मातोश्री, पत्नी अश्विनी, भाऊ धनंजय, मुलगी वैभवी आणि मुलगा विराज यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सर्व देशमुख कुटुंबाने जरांगे यांना वैद्यकीय उपचार घेण्याची विनंती केली, मात्र जरांगे यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर देशमुख कुटुंबाच्या आग्रहास्तव त्यांनी दोन घोट पाणी घेतले.
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी उपोषणाला बसलेल्या महिलांमध्ये जाऊन बसल्या. पण अचानक त्यांना चक्कर आली. यावेळी आजुबाजूला उपस्थित असलेल्या महिलांनी तातडीने डॉक्टरला बोलावून त्यांच्यावर उपचार केले.