बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोक्काखाली अटकेत असलेला वाल्मीक कराड याने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्याला मदत करणाऱया प्रत्येकाला सहआरोपी करा, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
सुरेश धस यांनी कराडविरोधात पुरावे मुख्यमंत्र्यांना सादर केले. परळी तालुक्यातील वर्धापूर, परळी ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर, शिरसाळा पोलीस स्टेशन येथे गेल्या दहा ते सतरा वर्षांपासून सतत पदावर असणाऱया पोलीस अधिकाऱयांच्या जिह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली.
न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करा; हायकोर्टात याचिका
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली असून लवकरच याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राजीनाम्यावर मी बोलणार नाही – धनंजय मुंडे
विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केल्याबद्दल पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले की, राजीनामा विषयावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया कागदपत्रांसहित उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटल्या. त्यामुळे या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील.
अजितदादा, नैतिकता शिल्लक असेल तरच बीडमध्ये पाऊल ठेवा!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याभोवती संशयाचे वलय आहे. या प्रकरणात ‘मकोका’ लावण्यात आलेले आरोपी तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हत्या प्रकरणात तपास यंत्रणांवर कुणाचा दबाव आहे, कुणाच्या गुंडगिरीपुढे पोलिसांनी शेपूट घातले आहे, हे सगळय़ा महाराष्ट्रासमोर उजागर झाले आहे. त्यामुळे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशा पोकळ गप्पा मारण्यापेक्षा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची धमक दाखवा. थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तरच बीडमध्ये पाऊल ठेवा, अशी मागणी बीडकर करत आहेत.
इथं बाप बसलेले आहेत आपण! वाल्मीक कराडची दुसरी क्लिप व्हायरल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘मकोका’खाली अटक असलेल्या वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात तो एका महिला पोलीस अधिकाऱयाला ‘इथं बाप बसलेले आहेत आपण!’ असे म्हणताना ऐकायला येत आहे. वादग्रस्त पोस्टच्या संदर्भात दाखल किरकोळ गुह्यातील अटक तरुणांना सोडून देण्याचे फर्मान सोडण्यासंदर्भातील हे संभाषण आहे.