जसप्रीत बुमरा सर्वोत्तम क्रिकेटपटू, आयसीसीच्या सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारावरही कोरले नाव

आपल्या भेदक आणि अचूक माऱ्यापुढे क्रिकेट विश्वातील महान आणि दिग्गज फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या जसप्रीत बुमराने आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटीपटूच्या पुरस्कारापाठोपाठ वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी दिल्या जाणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारावरही आपले नाव कोरले. आयसीसी पुरस्कारांच्या इतिहासात सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणारा बुमरा पाचवा हिंदुस्थानी क्रिकेटपटू ठरला आहे.

2024 या सालात एकीकडे हिंदुस्थानचे दिग्गज आणि महान फलंदाज सातत्यपूर्ण अपयशी कामगिरी करत असताना जसप्रीत बुमराने आपल्या भन्नाट आणि सुसाट गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानच्या डावाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमरा एकटाच यजमानांशी भिडत हिंदुस्थानचे आव्हान राखण्याचा प्रयत्न करत होता. गेल्यावर्षी बुमराने  86 विकेट टिपले. त्यापैकी 71 विकेट त्याने अवघ्या 14.92 च्या सरासरीने 13 कसोटी सामन्यांत टिपल्या तर टी-20 विश्वचषकात 8.26 च्या सरासरीने 15 विकेट टिपत हिंदुस्थानला जगज्जेतेपद जिंकून दिले होते. 1983 साली कपिलदेव यानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट टिपले होते. त्यानंतर बुमराची कामगिरी दुसऱया क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 32 कसोटी विकेट टिपत त्याने ‘मालिकावीर’ पुरस्कारही मिळवला होता. कालच बुमरा वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू ठरला होता तर आज त्याने सर्वोत्तम क्रिकेटपटूचाही पुरस्कार पटकावत आपला दबदबा निर्माण केला. महिलांमध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान मेली केरने मिळवला.

हिंदुस्थानी खेळाडूंचा दबदबा

आयसीसीच्या सर्वोत्तम पुरस्कारासह सर्वोत्तम महिला वन डे क्रिकेटपटूचा मान स्मृती मानधनाने मिळवला तर टी-20 क्रिकेटपटूचा पुरस्कार अर्शदीप सिंगने जिंकत हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचे वर्चस्व कायम राखले. विशेष म्हणजे आयसीसीच्या पुरस्कारांमध्ये हिंदुस्थानच्या एकाही पुरुष फलंदाजाला स्थान मिळवता आले नाही.

सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान मिळवणारा बुमरा पाचवा हिंदुस्थानी

जसप्रीत बुमरासाठी 2024 हे साल चांगलेच लाभदायी ठरले आहे. त्याने सर्वोत्तम कसोटीपटूसह सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर्वात प्रतिष्ठsचा पुरस्कारही जिंकला. याआधी हिंदुस्थानच्या चार क्रिकेटपटूंनी हा सन्मान मिळवला असून राहुल द्रविड (2004), सचिन तेंडुलकर (2010), रविचंद्रन अश्विन (2016) आणि विराट कोहली (2017 आणि 2018) यांनी सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान पटकावला होता. बुमरा हा मान मिळवणारा हिंदुस्थानचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.