कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार; चीन व हिंदुस्थान बैठकीत अखेर झाले शिक्कामोर्तब

कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांच्या बैठकीत अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवारी या दोन देशांतील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून या बैठकीत कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री हे सध्या तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावर दोन्ही देशांच्या नेत्यांनी कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा 2020 पासून बंद आहे, परंतु आता पाच वर्षांनंतर म्हणजेच 2025 मध्ये उन्हाळ्यात ही यात्रा पुन्हा एकदा सुरू होईल. यासाठी संबंधित यंत्रणा विद्यमान करारांनुसार चर्चा करतील असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या बैठकीत दोन्ही देशांनी जलवैज्ञानिक डेटाची तरतूद पुन्हा सुरू करण्यावर आणि सीमापार नद्यांशी संबंधित सहकार्यावर चर्चा करण्यावरसुद्धा बैठक घेण्याचे मान्य केले.

दोन्ही देशांमधील थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्त्वतः सहमती झाली. दोन्ही देशांतील संबंध स्थिर करण्यासाठी दोन्ही देशांकडून सकारात्मक पावले उचलली जातील.