कसारा घाटात मिनी बसचा अपघात, 21 जण गंभीर जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक

चालकाचा ताबा सुटल्याने कसारा घाटात मिनी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावर घडली. या अपघातात 21 जण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाचा ताबा सुटल्याने बस तीन वेळा उलटली.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील प्रवासी मुंबईहून सिन्नरला एका लग्नासाठी चालले होते. यावेळी शहापूर तालुक्यातील कसारा घाटात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस तीन वेळा उलटून अपघाग्रस्त झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.