लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त ते टिळक भवन येथे बोलत होते.
देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पण या अधिकारावरच भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपा सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे. काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगाने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे असे पटोले म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे, नोकर भरती करण्याचे आश्वासन देऊन भाजपा युती सत्तेत आली आहे. पण आता हे सरकार कर्जमाफी देण्यासाठी, नोकर भरतीसाठी निधी नाही असे सांगत आहे पण दुसऱ्याकडे सरकार बगलबच्च्यांवर सवलतींची खैरात करत साखर कारखान्यांचे 100 कोटी रुपयांचे व्याज माफ करते. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. महागाई कमी करण्याऐवजी एसटी, रिक्षा व टॅक्शीची भाडेवाढ करून जनतेला महागाईच्या संकटात लोटत आहे, असेही पटोले म्हणाले.