Nanded news – माहूरच्या ठाकूर बुवा यात्रेत भगर खाल्ल्यानंतर 52 भाविकांना विषबाधा, चार गंभीर

>> राज ठाकूर

नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात ठाकूर बुवा यात्रेमध्ये भगर खाल्ल्याने 52 भाविकांना विषबाधा झाली आहे. यामुळे खळबळ उडाली असून सर्व भाविकांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, तिर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात ठाकूर बुवा यांची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी षटतिला एकादशीला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पायी दिंड्या शहरात दाखल होतात आणि मोकळ्या जागेत, विविध मठात, मंदिर परिसरात राहुट्या उभारतात. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा येथूनही एक दिंडी देवदेवेश्वर परिसरात शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली होती.

शनिवारी दिवसभर देवदर्शन झाल्यानंतर एकादशीचा उपवास असल्याने भाविकांनी रात्री आठच्या सुमारास भगर खाल्ली. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास काही जणांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यांना त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जवळपास 52 जणांना माहूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे माहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी किरण वाघमारे, तहसीलदार किशोर यादव यांनी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना बोलावून उपचार केले. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.