‘बंधारा गायब’ घटनेचा कृषी विभागाकडून पंचनामा

तालुक्यातील म्हासुर्ली पैकी बाजारीचा धनगरवाडा येथील ‘बंधारा गायब’ झाल्याच्या वृत्तानंतर कृषी विभागाला जाग आली आहे. याप्रकरणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर शुक्रवारी (दि. 24) तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे आणि त्यांच्या टीमने स्थळ पंचनामा केला. मात्र, हा पंचनामा चुकीचा केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्याने केला आहे.

तालुक्यातील म्हासुर्ली पैकी बाजारीचा धनगरवाडा येथे कृषी विभागामार्फत नाल्यावर बांधलेला सिमेंटचा बांध जमीन सपाटीकरण केल्याने मातीखाली गडप झाल्याने शासनाचे लाखो रुपये मातीत गेले आहेत. याबाबतचे वृत्त दैनिक ‘सामना’ने ‘बाजारीचा धनगरवाडा परिसरातील बंधारा गायब’ या आशयाखाली 14 जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रभाव अधिकारी श्रुतिका नलवडे आणि तालुका कृषी त्यांच्या टीमने शुक्रवारी (दि. 24) स्थळ पंचनामा केला. दरम्यान, या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पतित पावन संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.