सगेसोयरे अधिसूचना काढून वर्ष झाले तरी सरकारने अंमलबजावणी केली नाही. आम्हाला न्याय मिळत नसल्याने आज 25 जानेवारीपासून आठव्यांदा सामूहिक बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारने मराठय़ांशी बेईमानी आणि गद्दारी केल्यास सामूहिक आंदोलनाचे लोण राज्यभर पसरेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला. आज उपोषणादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत आठव्यांदा उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करताच त्यांनी सरकारवर हल्ला केला. मुख्यमंत्री मराठय़ांशी गद्दारी करणार नाहीत. कारण मराठय़ांशिवाय कुणीही गुलाल उधळू शकत नाही. मुख्यमंत्र्यांना ही मोठी संधी आहे. यातून त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी राग, द्वेष की विष आहे हे सिद्ध होणार आहे. जे मराठे सत्तेत आहेत. त्यांची भूमिकाही समोर येणार असून, उपोषणातून आमचा मारेकरी कोण हे उघड होईल, असे ते म्हणाले. असले विरोधी पक्षनेते फक्त कामापुरते मराठय़ांना पुढे करतात, म्हणून काँग्रेस संपत आली आहे, असा पलटवार त्यांनी यावेळी केला.