देशातील सर्वात उंच पूल, लांबलचक बोगदे, अद्ययावत रेल्वे स्थानक बांधण्याचा अनुभव असूनही आजही कोकण रेल्वेला मध्य रेल्वेकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. 760 किमी रेल्वे मार्गिका उभारण्याचा दांडगा अनुभव असूनही मध्य रेल्वेने पाचोरा – जामनेर रूळ दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेतून कोकण रेल्वेला बाद केले असून हे काम अन्य एका कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत हायकोर्टाने मध्य रेल्वेला फैलावर घेतले इतकेच नव्हे तर कोकण रेल्वेची बाजू ऐकून घेतल्यानंतरच निविदेवर अंतिम निर्णय घेण्यास मध्य रेल्वेला बजावले.
पाचोरा जामनेर 53 किमी लांबीचे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यात पुलाच्या कामांचाही समावेश असून 696 कोटी 23 लाख रुपयांची निविदा रेल्वे प्रशासनाने काढली आहे. मात्र या निविदा प्रक्रियेतून बाद केल्याने कोकण रेल्वेने हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने कोकण रेल्वेची बाजू ऐकून घेत सोमवार पर्यंत निविदा सुरू ठेवण्याचे आदेश मध्य रेल्वेला दिले.
n मध्य रेल्वेच्या वतीने ऍड नारायण बुबना यांनी युक्तिवाद केला त्यांनी सांगितले की, कोकण रेल्वे तांत्रिक अटी पूर्ण करण्यात असमर्थ असल्याने ती फेटाळण्यात आली. त्यावर कोकण रेल्वेच्या वतीने निविदेतून बाद करण्यामागे नेमके कारण काय याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी मध्य रेल्वेला केली.