>> विश्वावसू काशीकर
भारत देशाची सुंदर व्याख्या काका कालेलकरांनी केली आहे. आपण जर कन्याकुमारीच्या दक्षिणेस गेलो तर ‘ध्रुव’ दिसेनासा होतो आणि कश्मीरच्या उत्तरेकडे गेलो की दक्षिणेकडे ‘अगस्ती’ दिसत नाही. यावरून काकांनी अशी व्याख्या बनवली की, जेथून ध्रुव आणि अगस्ती, दोन्ही दिसू शकतात तोच आपला ‘भारत’ देश. आपला अवाढव्य भारत देश एका नजरेत बांधण्याचे भाग्य अंतराळवीर राकेश शर्माला लाभले. असा हा ‘सारे जहाँ से अच्छा’ भारत देश…
राष्ट्र ही आधुनिक राजकीय संकल्पना आहे. तिचा उदयही फ्रेंच राज्यक्रांतीनंतर (1789) म्हणजे भारताबाहेरच झालेला आहे. आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचे भान ठेवून त्या परंपरांचे सातत्य राजकीय दृष्टीने म्हणजे राज्याच्या चौकटीत टिकवून ठेवणारा व विशिष्ट भौगोलिक प्रदेशनिष्ठा मनात बाळगणारा लोकसमूह किंवा समाज म्हणजे राष्ट्र असे सामान्यपणे म्हणता येईल. भारत हे ‘महाराष्ट्रा’सारख्या अनेक संघराज्यांनी बनलेले खंडप्राय राष्ट्र आहे. त्यामुळे इथे निरनिराळ्या रक्तसंबंधांचे जनसमूह असणे अपरिहार्य आहे. रक्तसंबंधाखेरीज प्रादेशिकता, इतिहास, धर्म आणि भाषा हे सगळे घटक राष्ट्रनिर्मितीस आधारभूत होत असतात. आपल्या देशात या प्रत्येक घटकाच्या संदर्भात विविधता आहे. या प्राथमिक घटकांखेरीजही भारतीय समाजात राजकीय एकतेच्या खोल भावनेने आपल्या देशात ‘राष्ट्र’ म्हणून जगण्याची ऊर्मी आहे हे गेल्या पंचाहत्तर वर्षांत सिद्ध झालेले आहे. आता आपण अभिमानाने म्हणू शकतो की, जो भारतीय तो तो माझा स्वकीय आहे. मी भारतीय, मी भारतीय, मी भारतीय आहे.
एकदा आचार्य दादा धर्माधिकारी जे. कृष्णमूर्तींना भेटायला गेले असता जे. कृष्णमूर्तींनी त्यांना विचारले, “मी सगळे जग फिरून पाहिले. प्रत्येक देशाच्या धर्म आणि संस्कृतीचा अभ्यास केला. आता मी एका शब्दात त्या-त्या संस्कृतीचं वैशिष्टय़ सांगू शकतो, पण भारत माझा स्वतचा देश असून भारतीय संस्कृतीचं वैशिष्टय़ एका शब्दात मला सांगता येत नाही. तुम्ही या कामी मला मदत कराल का?’’ दादा म्हणाले, “आज रात्री विचार करतो, काही सुचलं तर उद्या भेटायला येतो.’’ दुसऱया दिवशी दादा आले, म्हणाले, “मला वाटतं, मला तो शब्द सापडला आहे आणि ते फक्त भारतीय संस्कृतीचंच वैशिष्टय़ आहे. तो शब्द आहे ‘त्याग’. जे. कृष्णमूर्तींना ते पटले असावे. त्यांनी संमतीदर्शक मान हलवली.
अशीच भारत देशाची सुंदर व्याख्या काका कालेलकरांनी केली आहे. आपण जर कन्याकुमारीच्या दक्षिणेस गेलो तर ‘ध्रुव’ दिसेनासा होतो आणि कश्मीरच्या उत्तरेकडे गेलो ना, की दक्षिणेकडे ‘अगस्ती’ दिसत नाही. यावरून काकांनी अशी व्याख्या बनवली की, जेथून ध्रुव आणि अगस्ती दोन्ही दिसू शकतात तोच आपला ‘भारत’ देश. हा आपला अवाढव्य भारत देश एका नजरेत बांधण्याचे भाग्य राकेश शर्माला लाभले. राकेश शर्माने अंतराळातून तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींना फोन केला तेव्हा इंदिराजींनी त्याला विचारले की, पृथ्वीच्या इतक्या दूरून आपला भारत देश तुला कसा दिसतो? राकेश शर्माला उत्तराला कविताच मदतीला आली. तो म्हणाला, “सारे जहाँ से अच्छा!’’
तेव्हा राष्ट्र कसे तयार होते, तर गतकाळाच्या सामूहिक स्मृती, वर्तमानकालीन जीवनाची अनुभूती आणि भविष्याविषयीच्या आकांक्षा यातून जी अतूट भावबंधने निर्माण होतात, त्यांचे परिणत स्वरूप म्हणजे राष्ट्र होय. प्रत्येक राष्ट्राचे एक राष्ट्रगीत असते. आपल्या राष्ट्रगीताचा इतिहासही मजेशीर आहे. त्याआधी राष्ट्रगीताची व्याख्या पाहू. राष्ट्रगीत कोणत्या रचनेला म्हणायचे, तर संबंधित देशाच्या शासनसंस्थेची अधिकृत मान्यता लाभलेले व राष्ट्रीय उत्सवप्रसंगी म्हटले जाणारे गीत त्याला ‘राष्ट्रगीत’ म्हणतात. राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रगीत हेदेखील राष्ट्रीय एकात्मतेचे व अभिमानाचे प्रतीक असते.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात ‘वंदे मातरम’ या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला होता. 15 ऑगस्ट 1947 च्या स्वातंत्र्य सोहळ्याची सुरुवात ‘वंदे मातरम’ या गीतानेच झाली; पण पुढे भारतीय संविधान समितीने रवींद्रनाथ टागोरांच्या ‘जन गण मन’ या गीताची (पहिले कडवे) राष्ट्रगीत म्हणून निवड केली. सुंदरच आहे आपले राष्ट्रगीत. फक्त त्यातल्या एका शब्दाचा अर्थ फारसा माहीत नसतो म्हणून सांगतो. ‘उत्कल’ म्हणजे ‘ओfिडशा’.
राष्ट्रगीतासंबंधी काही नियम आहेत. ते सर्वांनी पाळले पाहिजेत. ज्या वेळी राष्ट्रगीत गायले जाते तेव्हा ते पूर्ण गायले जावे. विशिष्ट वेळेच्या मर्यादेतच ते गाऊन झाले पाहिजे. शास्त्राrय संगीतात ख्याल आठवतात तसे ही रचना घेऊन आठवता येणार नाही. राष्ट्रगीताच्या गायन-वादनाच्या प्रसंगी सर्व श्रोत्यांनी सावधान स्थितीत उभे राहावे असा नियम आहे. मात्र वार्तापट किंवा अनुबोधपटाचा एक भाग म्हणून वाजवण्यात येणाऱया राष्ट्रगीताच्या वेळी श्रोत्यांनी सावधान स्थितीत उभे राहण्याची सक्ती नसते आणि तशी अपेक्षाही नसते. राष्ट्र आणि राष्ट्रगीत यांविषयी एवढे जाणून घेतल्यानंतर आपण शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित स्वातंत्र्य हा विचार समजून घेऊ.
शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा विचार मूल्यशिक्षणाचा आला आहे. पूर्वी मूल्यशिक्षणासाठी परिपाठासारखा विशिष्ट तास किंवा वेळ असायचा. आता तुम्ही वर्गात जो विषय शिकवता त्यातून सूचकपणे मूल्यशिक्षण द्यायचे असते. उदा. सावरकरांच्या ‘माझे मृत्युपत्र’, ‘स्वातंत्र्याचे स्तोत्र’ किंवा ‘सागरा प्राण तळमळला’ या कविता शिकवताना मराठीचे शिक्षक राष्ट्रभावना या मूल्याचे कळत नकळत संस्कार करू शकतात.
राष्ट्रभावना हे मूल्य कोणताही विषय शिकवताना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवता येते. आपला राष्ट्रध्वज, आपले राष्ट्रपुरुष यांचा मान ठेवण्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले पाहिजेत. महाविद्यालयीन विद्यार्थी 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला झेंडावंदनासाठी मोठय़ा संख्येने अनुपस्थित राहतात. त्यांना सक्तीने हजर राहण्यास भाग पाडले पाहिजे. कितीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांची आपल्या लेखनातून निंदानालस्ती करणे हा राष्ट्रद्रोह मानला पाहिजे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लंडनमध्ये असताना त्यांना भारतामध्ये पोस्टामध्ये एक पाकीट पाठवायचे होते. पोस्टात काम करणाऱया महिलेला पाकिटावर चिकटवण्यासाठी त्यांनी तिकीट मागितले तेव्हा तिने ब्रिटनच्या महाराणीचे चित्र असलेले तिकीट दिले. बाबासाहेबांनी तिच्यासमोरच ते तिकीट चिकटवले. चुकून ते उलटे चिकटवले होते. कामावर असलेल्या त्या महिलेने त्याला आक्षेप घेतला आणि नुकतेच चिकटवलेले ते ओलसर तिकीट काढून ते पुन्हा नीट चिकटवायला सांगितले. बाबासाहेबांनी तसे केले आणि तिला एक प्रश्न विचारला, “समजा, तुमच्या अनुपस्थितीत मी हे असे तिकीट लावून पोस्टात टाकले असते तर?’’ ती म्हणाली, “माझ्या नजरेसमोर मी माझ्या राष्ट्रपुरुषांचा अपमान कदापि सहन करणार नाही.’’ आपण भारतीय राष्ट्रपुरुषांची तिकिटे चिकटवताना अशी काळजी घेतो का? उलटी तिकिटे चिकटवलेली कितीतरी पाकिटे पोस्टातून फिरत असताना दिसतात. राष्ट्रभावनेच्या बाबतीत आपण किती असंवेदनशील आहोत याचेच हे उदाहरण आहे.
शिक्षण आणि स्वातंत्र्य यांचा नेमका काय संबंध आहे? याचाही विचार केला पाहिजे. मुलांना शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य, पालकांना शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य, शिक्षकांना शिकवण्याचे स्वातंत्र्य व संस्था चालकांचे प्रशासन स्वातंत्र्य ही चांगल्या शिक्षणाची चार अंगे आहेत.
विद्यार्थ्यांना कृतीचे व शिकण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. लहान मुलांना तर पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. आजकाल पालक मुलांना जबरदस्तीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात. मातृभाषेतून शिक्षण घेणे हा मुलांचा हक्क आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून संस्कृतीविहीन पिढी तयार होत आहे. ख्रिस्ती मिशनऱयांनी काढलेल्या अशा शाळांमध्ये धार्मिक स्वातंत्र्यावर बंधने आणली जातात, अशी काही उदाहरणे आहेत. मुलांना त्यांचा कल लक्षात घेऊन ज्ञानशाखा निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनीअरच झाला पाहिजे हा पालकांचा हट्ट योग्य नाही.
शिक्षकांनी स्वत कृती संशोधन करून अध्यापनाच्या नवनव्या पद्धती शोधाव्यात. घटक नियोजन, घटक चाचण्या, प्रश्नपेढी, सत्र पद्धती यात शिक्षकांचा सहभाग कमी असेल तर शिक्षण पद्धतीत कधीच सुधारणा होणार नाही.
गोपाळ गणेश आगरकर पुण्याच्या शाळेत मुख्याध्यापक होते तेव्हाची गोष्ट. एका शिक्षकाचे अध्यापन त्यांनी वर्गात जाऊन पाहिले. शिकवण्यात ते चुकत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. तिथल्या तिथे त्यांनी ती चूक दुरुस्त केली आणि विद्यार्थ्यांना चुकीची माहिती सांगितल्याबद्दल शिक्षकाला दोष दिला.
तथापि शिक्षकांची चूक वर्गात दुरुस्त करण्यात आपण त्याचा अपमान केला ही बोचणी त्यांना लागून राहिली. शिक्षकाचे वैगुण्य आपण मुलांसमोर उघड करायला नको होते या विचाराने ते कमालीचे अस्वस्थ झाले. अखेर शाळा सुटल्यानंतर आगरकरांनी त्या शिक्षकाला बोलावून घेतले आणि “वर्गात मुलांच्या देखत मी तुमचा पाणउतारा केला हे अगदी अयोग्य झालं. तुम्ही राग मानू नका.’’ अशा शब्दांत त्यांनी त्यांची क्षमाही मागितली. आपल्या चुकीचे एवढे परिमार्जन केल्यावर आगरकरांना थोडे बरे वाटले. वरिष्ठ म्हणविणारे कितीसे लोक मनाचा एवढा मोठेपणा दाखवतात?
स्वातंत्र्य या एका संकल्पनेची शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात अनेक परिमाणे आपण लक्षात घेतली. विद्यार्थ्यी, शिक्षक, संस्था चालक या घटकांना आपल्यामधले उत्कृष्ट ते बाहेर काढून आपली जबाबदारी पार पाडता येईल, असे पर्यावरण आपल्याला निर्माण करता आले पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाच्या मनात व कामात आलेली मरगळ जाऊन एक नवे सळसळते चैतन्य निर्माण झाले पाहिजे. शिक्षणातली गुंतवणूक ही अर्थशास्त्राच्या परिप्रेक्ष्यातून एक उत्कृष्ट आणि महत्त्वाची गुंतवणूक आहे असे शासनाला वाटले पाहिजे. आपल्या देशात आणि राज्यात शिक्षणावर तुलनेने अतिशय कमी खर्च होतो. शालेय ग्रंथालये आणि वाचन संस्कृतीला पूरक असणारी सार्वजनिक ग्रंथालये वरचेवर क्षीण आणि दुबळी होत आहेत ही परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. सध्या महाराष्ट्राला सार्वजनिक ग्रंथालयाबाबतीत अतिशय अनुदार आणि तिय्यम दर्जाची वागणूक देणारा अर्थमंत्री लाभला आहे हेदेखील या जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)