सृजन संवाद – राजा कसा असावा?

>> डॉ. समिरा गुजर जोशी

आज 26 जानेवारी. हा आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिवस आहे. संविधानाचे अधिष्ठान आपण स्वीकारले ते प्रजेला केंद्रिभूत ठेवून. सुशासनाच्या कल्पनेत जनतेचे हित साधणे हाच मुख्य विचार असायला हवा. आपल्या प्राचीन राज्यव्यवस्थेत जरी राजसत्ता असली तरी प्रजाच केंद्रस्थानी असावी हा विचार तेव्हाही होता. सैधान्तिकदृष्टय़ा अनिर्बंध राजसत्ता ही आपल्या राज्यशास्त्रात कधी आदर्श मानली गेली नाही. रामायणात तर राम प्रजेप्रति आपले उत्तरदायित्व किती मानत असत ही गोष्ट आपण जाणतोच. यासाठी रामासमोर काय आदर्श होते? याची कल्पना देणारी ही गोष्ट. ही गोष्ट आहे उत्तरकांडातील. राजाने आपले कार्य वेळेवर पार पाडणे हे फार महत्त्वाचे असते. सरकारी कामात दिरंगाई होणे किंवा जनतेच्या कामांची दाद घेण्यास कोणी उपलब्ध नसणे हा अक्षम्य गुन्हा आहे. राम आणि लक्ष्मणामध्ये याविषयी चर्चा होत असताना रामाने लक्ष्मणाला ही गोष्ट सांगितली.

ही कथा पुढे भागवतात आणि महाभारतातही आलेली दिसते. रामायण काळामध्ये ही कथा पौराणिक कथा म्हणून प्रचारात असली पाहिजे. या आधीही राम-लक्ष्मण-सीता यांच्या संवादामध्ये अशा प्रकारच्या त्या काळात प्रचारात असलेल्या कथांचे उल्लेख आलेले आपण पाहिले आहेत.

तशी गोष्ट आहे नृग नावाच्या राजाची. अतिशय सदाचारी आणि दानशूर राजा होता तो. असे असतानाही त्याला शाप मिळाला. अशी काय चूक घडली त्याच्या हातून? तर झाले असे की राजाने एका यज्ञाच्या निमित्ताने फार मोठा दानधर्म केला. अनेक गायी त्याने दान दिल्या. कुणाला एक गाय दिली. कुणाला अधिक मिळाल्या. एका ब्राह्मणाला अशीच एक सुलक्षणी गाय दान मिळाली. त्याने तिला जवळ घेतले, थोपटले, पण दानाचा तो सोहळा सुरू असताना ती गाय हरवली. तो ब्राह्मण तिला सर्वत्र शोधू लागला, पण ती सापडेना. अखेर ती त्याला दिसली ती दुसऱया एका ब्राह्मणाच्या गोठय़ात. त्याने गाईला हाक मारली आणि गाईने त्याला ओळखून त्याच्या जवळही आली. ही आपलीच गाय याची त्याला खात्री पटली. पण त्या दुसऱया ब्राह्मणाला मात्र याचे म्हणणे पटेना. त्याला वाटले इतर गाईंबरोबरच आपल्याला ही गाय दान मिळाली आहे. त्याने काही ती चोरून आणली नव्हती. दोघांमध्ये वाद सुरू झाला.

हा वाद मिटवण्यासाठी ते पुन्हा एकदा नृग राजाकडे गेले. त्यांनी अनेक दिवस वाट पाहिली, पण राजासमोर जाण्याची संधी काही त्यांना मिळेना. त्यांची दाद घ्यायला राजा बहुधा उपलब्ध नव्हता. आजही ज्याच्याकडे काम आहे तो अधिकारी बिझी आहे, सुट्टीवर आहे, लवकर गेले आहेत, मीटिंगमध्ये आहेत अशा सबबी आपण ऐकतोच. पण राज्य कारभारात या प्रकारची दिरंगाई योग्य नाही. समस्या निवारण ही राजाची वा अधिकाऱयाची जबाबदारी आहे. मी दानधर्म केला. प्रजा मला धन्यवाद देते आहे. आता मी आराम करेन असे होऊ शकत नाही. राजाला विश्रांती घ्यायची मुभा नाही आणि असलीच तर त्यावर अनेक मर्यादा आहेत. नृग राजा इथे चुकला. या दोन ब्राह्मणांचा विवाद सोडवण्यासाठी तो उपलब्ध होऊ शकला नाही. त्या ब्राह्मणांनी त्याला चिडून शाप दिला की तू स्वततच रमला आहेस. तेव्हा तू बिळात राहणारा सरडा होशील. श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, “म्हणून एक राजा म्हणून मी सतर्क राहायला हवं. माझ्या प्रजेच्या काही पारी असतील, समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मी सदैव सज्ज असायला हवे.”
पण लक्ष्मणाने या विषयी नाराजी व्यक्त केली. इतक्या सत्शील राजाला एवढी कठोर शिक्षा व्हावी हे त्याला पटले नाही. श्रीराम त्याला म्हणाले, “मग तू नृग राजाची यावरची प्रतिािढया समजून घे. हे कळल्यावर त्याने काय केले हे जाणणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या या शापाची हकीगत कळताच त्याने सर्व मंत्र्यांची आणि प्रजाजनांची सभा बोलावली. आपल्याकडून जी चूक झाली त्याची जबाबदारी स्वीकारली. त्याने ताबडतोब राज्यावरील आपला अधिकार सोडला आणि युवराजाला राज्याभिषेक केला. आपल्यासाठी एक खंदक बनवून घेतला. सरडा म्हणून जो काही काळ घालवणे नशिबात असेल तो त्या खंदकात घालवण्याचे त्याने ठरवले.”

श्रीराम म्हणतात, “राजाने आपल्या चुकांकडे असे उघडय़ा डोळ्याने पाहायला हवे. त्यांची जबाबदारी स्वीकारायला हवी. प्रायश्चित्ताची तयारी असायला हवी.” आजही या गोष्टीतून किती शिकण्यासारखे आहे. प्रजासत्ताक राज्यात ही कथा प्रत्येक लोकप्रतिनिधीला ठाऊक असेल तर आपल्या कामकाजाचे चित्र वेगळे दिसेल. नाही का!

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)