भटकंती – सह्याद्रीचा मुकुटमणी

>> जे. डी. पराडकर

देखण्या, राजबिंडय़ा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला प्रचितगड जणू सह्याद्रीचा मुकुटमणीच! महाराजांच्या गडकोट ऐश्वर्यातील हा हिरा गडवाटा धुंडाळणाऱयांसाठी तितकाच धाडसी अनुभव देणारा आहे.

प्रत्येक ऋतूमध्ये सह्याद्रीचे सौंदर्य वेगवेगळं दिसतं. अशा देखण्या, राजबिंडय़ा सह्याद्रीच्या कुशीत संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर, तिवरेघेरा या ऐतिहासिक गावात गेल्यानंतर आठवतो तो प्रचितगड! सह्याद्रीच्या उंच शिखरावर असल्याने तो सह्याद्रीचा मुकुटमणीच भासतो. या प्रचितगडाची वाट खूपच बिकट! ही वाट एवढी अवघड आहे की, छत्रपती संभाजी महाराज कसबा येथून वेळीच प्रचितगडावर पोहोचले असते तर शत्रूच्या हाती कधीही लागले नसते. याबरोबरच महाराष्ट्राचा इतिहासदेखील बदलला असता. स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट म्हणजे स्वराज्याचे ऐश्वर्य तर होतेच, शिवाय ढालीप्रमाणे संरक्षण करणारेदेखील होते. संगमरत्न फाऊंडेशनचे शिलेदार अल्पेश सोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचितगड परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करत आहेत ही बाब नक्कीच अभिनंदनीय आहे.

शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर तिवरेघेरामार्गे प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिह्याची हद्द लागते. सातारा जिह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. कंधार डोहाची छायाचित्रे व माहिती उपलब्ध असल्याने देशाच्या विविध राज्यांतून असंख्य तरुण पर्यटक हा प्रसिद्ध डोह पाहण्यासाठी येतात. प्रचितगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग शृंगारपूर, तिवरेघेरा येथून जातो. या मार्गावरून जाण्यासाठी साडेतीन तासांची उभ्या डोंगराची चढाई करावी लागते. या मार्गावरून जायचे म्हणजे ट्रेकिंगची सवय असायला हवी. दुसरा मार्ग निवळी, नेरदवाडी, मळेघाटमार्गे प्रचितगडावर जातो. याच मार्गावरून छत्रपती संभाजी महाराजांना दगाबाजीने पकडल्यानंतर नेण्यात आले होते. या मार्गावरून जाणे शृंगारपूर येथून जाणाऱया मार्गाच्या तुलनेत सुकर आहे. साधारण 1985 सालापर्यंत पाटण येथून हेडी म्हणजे गुरे विक्रेते संगमेश्वर तालुक्यातील आठवडा बाजारांमध्ये जनावरे विक्रीसाठी घेऊन येत.

पाटण, मळेघाटमार्गे नेरदवाडी, निवळी येथून संगमेश्वर येथे शेकडो जनावरे धूळ उडवत येत असत. प्रचितगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग राखीव वनक्षेत्रात येत असल्याने गडावर जायचे असेल तर वन विभागाची लिखित परवानगी घ्यावी लागते. विनापरवानगी जाणाऱया इतिहासप्रेमींवर वन विभागाकडून कारवाई केली जाते. याबरोबरच सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे गडावर जाण्यासाठी मळलेली वाट नसल्याने सोबत वाटाडय़ा न्यावाच लागतो.

छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात भवानीदेवी प्रसन्न होती याची साक्ष प्रत्येक गडकिल्ल्यावर पटते. प्रचितगडावरदेखील खडक खोदून आत असलेले थंड पाण्याचे टाके आहेत. ऐन मे महिन्यातही इथे मुबलक पाणी असते. गडावरील गढी अर्धवट पडक्या स्थितीत आहे. गडाच्या दक्षिणेकडील भागात एक कोठार आहे. कोठाराचे छप्पर शिल्लक नसले तरी भिंती अर्धवट पडक्या स्थितीत आहेत. कोठारात किंवा कोठारसदृश या बांधकामात दिवा लावण्यासाठी छोटा कोनाडा केलेला दिसतो. कोठाराशेजारून वाट गडाच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकावर जाते. कोठारसदृश भागाजवळ आणि भवानी मंदिराजवळ बांधकामाची काही जोती दिसून येतात. गड सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा वेगळा झालेला दिसतो. गडाला एकूण 18 बुरूज असल्याचा उल्लेख असून प्रत्यक्षात आज गडाचे 12 बुरूज अस्तित्वात आहेत. गडावर पडणाऱया प्रचंड पावसामुळे गडावरील अवशेष हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

प्रचितगड या किल्ल्याचा उचितगड या नावाने अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आलेला दिसतो. सूर्यराव सुर्वे हे संगमेश्वर व शृंगारपूर या भागाचे आदिलशाहाचे सरदार होते. त्यांच्या अमलाखाली शृंगारपूर व प्रचितगड होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी एप्रिल 1661 मध्ये सूर्यराव सुर्वे यांच्यावर स्वारी करून प्रचितगड जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड घेतल्याचे उल्लेख शिवभारत, जेधे शकावली व शिवचरित्र प्रदीप या ग्रंथांमधे येतात, परंतु सभासद बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये प्रचितगडचे नाव येते. याचा अर्थ असा की, किल्ला महाराजांनी बांधला; परंतु काही काळ तो सुर्व्यांकडे होता व नंतर परत महाराजांनी तो घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात प्रचितगड हा स्वराज्यातच होता, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा मुक्काम प्रचितगडच्या पायथ्याशी असलेल्या शृंगारपूरमध्ये अनेक वेळा झालेला होता. किल्ल्यांवरील वास्तू व इतर अवशेष पाहून किल्ला कधीच मोगलांकडे किंवा मुस्लिम सत्ताधीशांकडे गेला नसावा. मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून घेतला (1818). किल्ला जिंकल्यावर तो पाडल्याचे उल्लेख येतात; परंतु किल्ला न पाडता किल्ल्यावर जाणारे रस्ते सुरुंग लावून उडविण्यात आले.

[email protected]