साय-फाय – अंतराळ स्पर्धा

>> प्रसाद ताम्हनकर

अमेझॉन या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक आणि जगातील दुसऱया नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेजोस सध्या त्यांच्या ‘ब्लू ओरिजन’ स्पेस कंपनीमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या कंपनीचे न्यू ग्लेन रॉकेट गेल्या सोमवारी फ्लोरिडाच्या केप कनाव्हराल फोर्स स्टेशनवरून अवकाशात झेपावणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे. 2021 साली आपल्या या अंतराळ कंपनीकडे पूर्ण लक्ष देता यावे यासाठी जेफ यांनी अमेझॉनचा राजीनामा दिला होता. त्यांच्या ब्लू ओरिजन कंपनीला सध्या जगभरात चर्चेत असलेल्या दुसऱया व्यक्तिमत्त्वाच्या म्हणजेच एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या अंतराळ कंपनीचे तगडे आव्हान असणार आहे.

अंतराळाला कवेत घेण्याची स्वप्ने बघणाऱया या दोन्ही व्यक्तींचे यासंदर्भातले विचार अत्यंत स्पष्ट आहेत. स्पेस एक्स, टेस्ला आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) यांचे मालक असलेले एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ‘मानवाला आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर त्याला अनेक ग्रहांवर राहण्यासाठी स्वतःला सक्षम बनवायला हवे’ असे त्यांचे स्पष्ट मत आहे. मंगळावर मानवी वस्ती वसविण्याच्या त्यांच्या उद्देशाबद्दलदेखील ते ठाम आहेत आणि त्या दृष्टीने विविध अंतराळ मोहिमांची आखणीदेखील केली जात आहे.

‘अंतराळासाठी एक रस्ता बनवणे आणि त्याच्या मदतीने आपल्या मुलांचे आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करणे’ हा उद्देश जेफ बेजोस हे बाळगून आहेत. पृथ्वीच्या फायद्यासाठी लाखो लोकांनी इतर ग्रहांवर वस्ती करावी आणि तिथे काम करावे अशा हेतूने ब्लू ओरिजन या कंपनीची स्थापना करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ब्लू ओरिजिन कंपनीने आपल्या स्पेस टुरिझम या प्रोग्रामच्या मदतीने यापूर्वी सर्वात तरुण अंतराळवीर ऑलिव्हर डॅमन (18 वर्षे) आणि सर्वात वयस्कर अंतराळवीर एड ड्वाइट (90 वर्षे) यांना अंतराळाच्या प्रवासावर नेले आहे.

स्पेस एक्स आणि ब्लू ओरिजन या कंपन्यांमधील संघर्ष तसा जुना आहे आणि अनेकदा तो सार्वजनिक स्वरूपातदेखील समोर आला आहे. 2021 साली नासाच्या ‘मून लॅंडिंग’ या मोहिमेचा करार ब्लू ओरिजनला नमवत स्पेस एक्स कंपनीने पटकावला होता. 2.9 अरब डॉलर्सचा हा करार हरल्यानंतर ब्लू ओरिजन कंपनीने अमेरिकन सरकारवर थेट खटला दाखल केला होता. दुसरीकडे सध्याचे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांची जवळीक असली तरी आपल्याला मस्क यांच्या प्रामाणिक हेतूविषयी शंका नसल्याचे जेफ यांनी स्पष्ट केले आहे, तर दुसऱया बाजूला ब्लू ओरिजनच्या सोमवारच्या उड्डाणासाठी मस्क यांनीदेखील कंपनीला शुभेच्छा दिल्या होत्या.
गर्भश्रीमंतांच्या या स्पर्धेला अनावश्यक ठरवताना जगातील काही प्रसिद्ध व्यक्तींनी टीकादेखील केलेली आहे. यासंदर्भात टीकाकारांकडून मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि एक मोठा काळ जगातील श्रीमंतांच्या यादीत मानाच्या स्थानावर असलेल्या बिल गेट्स यांचे उदाहरण दिले जाते.

2023 मध्ये एका मुलाखतीत बोलताना बिल गेट्स म्हणाले होते की, प्रत्यक्षात मंगळ ग्रहावर पोहोचण्याचा खर्च हा प्रचंड आहे. त्याऐवजी तुम्ही गोवरची लस खरेदी करू शकता आणि प्रत्येक 1000 डॉलर्समागे (साधारण 87 हजार रुपये) एक जीव वाचवू शकता. दुसरीकडे, या स्पर्धेमुळे अंतराळात निर्माण होत असलेल्या अनावश्यक आणि धोकादायक कचऱयाचादेखील विचार प्रकर्षाने होणे गरजेचे आहे, असे अनेक अंतराळतज्ञ सांगत आहेत.
[email protected]