आयसीसीच्या सर्वोत्तम ‘वन डे’ संघात हिंदुस्थानच्या एकाही खेळाडूला स्थान नाही, तर महिला संघात दोघींची वर्णी

चॅम्पियन्स ट्रॉ़फीआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘वन डे टीम ऑफ द ईयर’ची घोषणा केली आहे. आयसीसीने 2024 मधील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर हा संघ निवडला आहे. धक्कादायक म्हणजे या संघात हिंदुस्थानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. मात्र पाकिस्तानसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रही न ठरलेल्या अफगाणिस्तान, श्रीलंकेच्या खेळाडूंची यात निवड झाली आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे.

‘वन डे टीम ऑफ द ईयर’मध्ये एकाही हिंदुस्थानी खेळाडूला स्थान न मिळाल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण यामागील कारण आता स्पष्ट झाले असून गेल्या वर्षी हिंदुस्थानच्या संघाने फक्त 3 वन डे लढती खेळल्या होत्या. यातील एकही सामना हिंदुस्थानला जिंकता आला नव्हता. त्यामुळे आयसीसीच्या सर्वोत्तम वन डे संघात एकाही हिंदुस्थानी खेळाडूला स्थान मिळाले नाही.

आयसीसीचा सर्वोत्तम ‘वन डे’ संघ

सॅम अयूब, रहमानुल्लाह गुरबाज, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, अजमतुल्लाह उमरझई, वानिंदु हसरंगा, शाहिन शाह आफ्रिदी, हॅरिस राउफ, अल्लाह गजनफर.

महिला संघात स्मृती, दिप्ती

आयसीसीने महिलांचाही सर्वोत्तम संघ निवडला असून यात हिंदुस्थानच्या दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे. स्मृती मंदाना आणि दिप्ती शर्मा या दोघांची आयसीसीच्या संघात निवड झाली आहे. गतवर्ष स्मृतीसाठी खास ठरले होते. तिने 13 लढतीत 747 धावा केल्या होत्या, तर दिप्तीने 13 लढतीत 24 विकेट्स घेत 186 धावाही फटकावल्या होत्या.