उत्तर प्रदेशात 200 कोटींचा टोल घोटाळा; महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 42 टोलनाक्यांवर व्हायची वसुली

उत्तर प्रदेशात एनएचएआय अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझावरील कर संकलनातील घोटाळा उत्तर प्रदेशच्या एसटीएफ अर्थात विशेष कृती दलाने उघडकीस आणला आहे. हा टोल घोटाळा तब्बल 200 कोटी रुपयांचा आहे. लखनऊ एसटीएफच्या पथकाने मिर्झापूरमधील अतराइला टोल प्लाझावर छापा टाकून तिघांना अटक केली आहे. एका टोल प्लाझावर काम करणाऱ्या इंजिनीअरनेच त्याचे डोके लावून हा घोटाळा केला. त्याला टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनीही साथ दिल्याचे समोर आले आहे.

मनीष मिश्रा, राजीव कुमार मिश्रा आणि आलोक सिंह हे प्रमुख आरोपी आहेत. घोटाळेबाजांनी टोल प्लाझावर बसवण्यात आलेल्या एनएचएआयच्या कॉम्प्युटरमध्ये त्यांचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले होते. त्यामुळे फास्टॅगशिवाय जाणाऱ्या वाहनांच्या वसुलीतील रक्कम वळती होत होती.

दोन वर्षांपासून अत्राइला येथील शिवगुलाम टोल प्लाझातून रोज 45 हजार रुपये गोळा करण्यात येत होते. अशा प्रकारे या लोकांनी आतापर्यंत एकट्या या टोलनाक्यावरून 3 कोटी 28 लाख रुपये वसूल केले आहेत. या आरोपींनी आतापर्यंत देशातील 12 राज्यांतील 42 टोलनाक्यांवर एनएचआयएचे समांतर सॉफ्टवेअर बसवले आहे.

दोन लॅपटॉप, एक प्रिंटर, 5 मोबाईल आणि रोकड जप्त

एसटीएफचे निरीक्षक दीपक सिंह यांनी या प्रकरणी तक्रार दिली आणि लालगंज पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एसटीएफने आरोपींकडून दोन लॅपटॉप, एक प्रिंटर, 5 मोबाईल, एक कार आणि 10 हजार रुपये जप्त करण्यात आले. एसटीएफच्या चौकशीदरम्यान आरोपींनी 12 राज्यांतील सुमारे 200 टोल प्लाझांवर अशा प्रकारचा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले.

या टोलनाक्यांवर वसुली

200 पैकी 42 टोल प्लाझांवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, आसाम, जम्मू-कश्मीर, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे, तर उत्तर प्रदेशात आझमगड, प्रयागराज, बागपत, बरेली, शामली, मिर्झापूर आणि गोरखपूर येथे वसुली होत होती.