महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

महायुती सरकारमध्ये सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. पण लवकरच महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत शिवसेनेचा मेळावा पार पडला. तर मिंधे गटाने बीकेसीतील मेळाव्यात जुनेच रडगाणे गायले. याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे यांना गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी आधी पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. शिंदे काल मुख्यमंत्री होते, आजउपमुख्यमंत्री आहेत आणि उद्या तेही राहणार नाहीत. कारण महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असून तो त्यांच्याच पक्षातील आहे.’

भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा आणि त्याद्वारे मिळवलेली सत्ता प्रतिष्ठा देत नाही. मिंधे तात्पुरते असून ज्यांनी आज त्यांना ही पदं दिली आहेत, तेच उद्या त्यांच्याकडून ही पदं काढून घेतील आणि त्यांच्यातील लोक त्या पदावर बसवतील. दिल्लीत पडद्यामागे याच्या हालचाली सुरू आहेत, असेही राऊत म्हणाले.

दिल्लीदरबारी शिंदेंचे वजन कमी झाले का? असे विचारले असता राऊत खिल्ली उडवत म्हणाले की, याचे वजन कुठे होते. टायरमध्ये पंपाने हवा भरतात तसे अमित शहा यांनी पंपाने हवा भरलेले हे नेते आहेत. बाळासाहेबांनी यांना भरपूर दिले, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती. पण आता काय आहे? असा सवालही राऊत यांनी केला.

महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात मुजरा करण्यासारखं, संजय राऊत यांचा मिंधेंना टोला

यावेळी संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्या विधानाचाही समाचार घेतला. कोण जातंय, कोण राहतंय याची सगळी माहिती असून आमचा गाळ सगळा गेलेला आहे. ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली ते जातील, पण अनेक वादळं, संकटं पचवून बाळासाहेबांच्या विचाराबरोबर असणारे कुणी जाणार नाही, असेही राऊत म्हणाले. तसेच पैसा फेको, तमाशा देखो ही शिंदेंची विचारधारा आहे. पण महाराष्ट्राच्या मुळावर येईन त्याला उखडून फेकू. भ्रष्टाचाराची मुळं खोलवर रुजलेली आहेत. ती उखडून फएकायला वेळ लागेल, पण उखडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.

उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला? शरद पवार यांची सडकून टीका