अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील मुर्थल पोलीस ठाण्यात या दोन्ही अभिनेत्यासह आणखी 13 जणाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलाय. सोनीपत जिल्ह्याचे रहिवाशी विपुल अंतिल यांनी तक्रार दाखल केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमध्ये रजिस्टर्ड कंपनी ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या जाहिरातींचे प्रमोशनशी हे प्रकरणी संबंधित आहे. ही कंपनी 50 लाखांहून अधिक लोकांचे पैसे घेऊन फरार झाल्याची माहिती आहे. याच कंपनीसाठी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांनी जाहीरात केल्याचा आरोप आहे. तसेच या कंपनीच्या कार्यक्रमांसाठी अभिनेता सोनू सूदही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता.
कंपनीने लोकांना कसे फसवले ?
ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या कंपनीने ६ वर्षांपूर्वी लोकांकडून पैसे घेतले होते. लोकांनी मुदत ठेवी (FD) किंवा इतर मार्गाने कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यांना भरघोस परतावा देण्यात येईल, असे आश्वासन कंपनीतर्फे दिले होते. तसेच लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी महागड्या आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित करण्यात आले. बॉलीवूड स्टार्सना देखील यात समावेश करण्यात आला होता. सुरुवातीला कंपनीने काही लोकांना पैसे दिले, मात्र कोट्यवधी रुपये जमा झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. जेव्हा लोक पैसे मागू लागले तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल बंद करण्यास सुरुवात केली. हळूहळू कंपनीने लोकांसोबतचा संपर्क तोडला. अशी माहिती विपुल अंतिल यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, या प्रकरणावर 25 जानेवारीला न्यायालयात सुनावणी होईल.