प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी निघाल्यानंतर मुंबई, ठाण्यासह सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. मात्र याआधीच उल्हासनगर क्राइम ब्रँचने बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून महिनाभरात या पथकाने बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १७ बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुकतेच क्राइम ब्रँचने आणखी एका घुसखोर महिलेला उल्हासनगरातून पकडले आहे.
ठाणे जिल्ह्यात बांगलादेशींना पकडण्यात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग फ्रंटफुटवर आहे. क्राइम ब्रँचने उल्हासनगर, विठ्ठलवाडी, मानपाडा, कोळसेवाडी या ठिकाणी छापा टाकून बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे. क्राइम ब्रँचने डिसेंबर २०२४ पासून तब्बल १६ बांगलादेशींना पकडण्याचा रेकॉर्ड केला. यामध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा, कोळसेवाडीत पाच, मानपाडा येथे पाच तर उल्हासनगरात एक अशा बांगलादेशी घुसखोरांना बेड्या ठोकण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी आणखी एक बांगलादेशी महिला क्राइम ब्रँचच्या जाळ्यात सापडली.
चार महिन्यांपूर्वी हिंदुस्थान- बांगलादेशाची सीमा ओलांडून आलेली महिला उल्हासनगरात राहत होती. आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ या ठिकाणी छापा टाकून रुमा बिबी उर्फ सालया हाफिजुल खान हिला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, उपनिरीक्षक सचिन कुंभार, सुरेश जाधव, प्रकाश पाटील, शेखर भावेकर, मिलिंद मोरे, प्रसाद तोंडलीकर, मनोरमा सावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या महिलेला आश्रय देणाऱ्यालाही आरोपी करण्यात आले असून तो फरार आहे.