अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या हिंदुस्थानींना मायदेशात आणण्यास तयार

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या आणि दस्तावेज नसलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना कायदेशीर पद्धतीने मायदेशात आणण्यासाठी आम्ही तयार असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केले. सरकार म्हणून आम्ही नेहमीच कायदेशीर बाबींचे समर्थन करतो. आमच्या देशातील प्रतिभा आणि कौशल्यांना जागतिक स्तरावर जास्तीत जास्त संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे. पण, बेकायदेशीरपणे होत असलेल्या स्थलांतराला आमचा विरोध असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

जयशंकर पुढे म्हणाले की, ‘एखाद्या देशात जेव्हा काही बेकायदेशीर घडते, तेव्हा अनेक बेकायदेशीर घटना तोंड वर काढत असतात. हे निश्चितपणे प्रतिष्ठेच्या दृष्टीने चांगले नाही आणि याला अमेरिकादेखील अपवाद नाही. आमचा कोणताही नागरिक बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत असेल तर त्याला हिंदुस्थानात परत आणण्यासाठी आम्ही तयार आहोत. याबाबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा झाली आहे. …तर संबंध सुधारणार नाहीत

मी मार्को रुबिओ यांना सांगितले की, कायदेशीररीत्या मार्ग काढणे आपल्या परस्पर हिताचे आहे. जर अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी तब्बल 400 दिवसांचा कालावधी लागत असेल तर संबंध आणखी सुधारतील असे मला वाटत नाही, असेही जयशंकर यांनी नमूद केले. दरम्यान, ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे एक लाख 80 हजार हिंदुस्थानी नागरिकांचे नागरिकत्व धोक्यात आले आहे.