ठाण्यात कोंबड्यांना बर्ड फ्लू, 21 कोंबड्या, 200 अंडी नष्ट केली

ठाण्यातील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे अखेर उघड झाले असून या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोपरीतील 21 कोंबड्या तसेच 200 अंडी नष्ट करण्यात आली आहेत. दरम्यान दहा किलोमीटर परिसरातील चिकन सेंटर, कोंबड्या तसेच तेथे काम करणाऱ्या कामगार व मालकांचीदेखील कसून तपासणी सुरू केली आहे. बर्ड बर्ड फ्लू या रोगाचा अन्यत्र फैलाव होऊ नये म्हणून महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या कोपरी येथील शासकीय निवासस्थानाच्या आवारात पाळलेल्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने या कोंबड्यांची वैद्यकीय चाचणी केली असता त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. बर्ड फ्लूची साथ पसरू नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून परिसरात सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या सर्व्हेदरम्यान जिल्हा पशुसंवर्धन विभाग व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने एक किलोमीटर परिसरात कोंबड्यांची तपासणी केली असता 21 कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले.

जिल्हा प्रशासनासोबत ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभागही युद्धपातळीवर सर्व्हे करत आहेत, पण बर्ड फ्लूबाबत प्रत्येक नागरिकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसांसाठी परिसरातील नागरिकांनी चिकन, अंडी खाणे टाळावे. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे दिसू लागताच नागरिकांनी डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावे. 

चेतना के. (मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महानगरपालिका

127 जणांची तपासणी 

बर्ड फ्लूचा पसरू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोपरीतील 10 किलोमीटर परिसरातील चिकन सेंटरमधील कोंबड्यांसह मालक, कामगार अशा एकूण 127 जणांची तपासणी केली आहे. त्यापैकी सर्दी, खोकला, तापसारखी लक्षणे आढळून आलेल्या 75 जणांचे स्वॅप आरोग्य विभागाकडून घेतले. सुदैवाने त्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.