रशियाने युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धास पूर्णविराम देण्यासाठी तोडगा काढला नाही तर त्यांच्यावर लादण्यात आलेल्या बंधनाबरोबरच नवीन कर लादले जातील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. जवळपास तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. हा संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वाटाघाटी करण्यास नकार दिला तर त्यांच्या देशावर निर्बंध लादले जातील, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले.
…तर आणखी निर्बंध लादणार
ट्रम्प म्हणाले की, रशियाने युद्ध संपवण्यासाठी लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा अमेरिकेसह इतर सहकारी देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या रशियन वस्तूंवर कर, आयात शुल्क आणि निर्बंध लादण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वॉशिंग्टन येथील रशियाच्या दूतावासाने याबाबत कोणतीही टिप्पणी केली नाही. दरम्यान, ट्रम्प यांनी इतर सहभागी देश कोणते आहेत याबद्दल माहिती सांगितली नाही.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशियावर नाना प्रकारचे निर्बंध लादले आहेत. बँकिंग, संरक्षण, उत्पादन, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांतील हजारो संस्थांचा यामध्ये समावेश आहे. अलीकडेच अमेरिकेने ऑइल आणि गॅस उत्पादकांवर सर्वांत कठोर निर्बंध लादून रशियाच्या ऊर्जा क्षेत्रातील महसुलाला मोठा धक्का दिला.