कर्नाटकात Mpox चा पहिला रुग्ण आढळला, दुबईहून आलेला व्यक्ती बाधित

कर्नाटकात Mpox चा पहिला रुग्ण आढळला आहे. दुबईहून आलेला 40 वर्षीय इसम Mpox बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) ने ही याची पुष्टी केली आहे. पतीला विमानतळावर घ्यायला गेलेल्या सदर रुग्णाच्या पत्नीलाही वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

हा इसम 17 जानेवारी रोजी दुबईहून मंगळुरूला आला. यानंतर त्याला अंगावर पुरळ आले आणि ताप आला. तात्काळ त्याला वैद्यकीय देखरेखीखाली विलगीकरणात ठेवण्यात आले. एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मंकीपॉक्स फक्त जवळच्या संपर्कातून पसरतो आणि कोविड-19 पेक्षा कमी धोकादायक आहे. लोकांनी घाबरू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.