मदर डेअरीची जागा अदानीच्या घशात जाऊ देणार नाही! कुर्ल्यातील रहिवाशांचे चक्का जाम आंदोलन

कुर्ला येथील मदर डेअरीची 21 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीच्या घशात जाऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत कुर्ला येथे स्थानिक रहिवाशांनी आज जोरदार आंदोलन करत चक्का जाम केला. स्थानिकांनी आणि लोकचळवळीच्या वतीने काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चाचे नेतृत्व मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केले.

कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेवर बॉटनिकल गार्डन करून स्थानिकांना सुविधा द्या, वाढत्या प्रदूषणापासून दिलासा द्या, मात्र कोणत्याही परिस्थितीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली ही जागा अदानी समूहाला देऊ नका, अशी मागणी करत  कुर्लावासीयांनी नेहरूनगर येथे सरकारविरोधात जोरदार निषेध मोर्चा काढला होता, मात्र पोलिसांनी दडपशाही करत हा मोर्चा मध्येच रोखण्याचा प्रयत्न केला, आंदोलकांशी धक्काबुक्की केली. त्यामुळे रहिवाशांनी रस्त्यात बस्तान बसवले आणि काही तासांसाठी चक्का जाम केला.

वर्षा गायकवाड जखमी 

एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि याच लाडक्या बहिणींना भाजप सरकारच्या पोलिसांनी धक्काबुक्की केली. पोलिसांच्या धक्काबुक्कीत खासदार वर्षा गायकवाड यांच्या पायाला जखम झाली, मात्र त्यानंतरही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.

काय आहे स्थानिकांची मागणी 

मदर डेअरीच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेली शेकडो झाडांची कत्तल करून हा भूखंड अदानीला दिला जाणार आहे. मुंबईत प्रदूषण वाढत आहे आणि दुसरीकडे सरकार अदानीसाठी शेकडो झाडांची कत्तल करत आहे. या जागेवर बॉटनिकल गार्डन करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.