जन्मदात्या पित्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून तुरुंगात चार वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या पित्याची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोणताच बाप पोटच्या पोरीचे लैंगिक शोषण करणार नाही, किंबहुना कोणतीही मुलगी आपल्या पित्यावर असे गलिच्छ आरोप करणार नाही. मात्र मानवी वृत्ती व मानसशास्त्र विचारात घेता अशा चुका घडू शकतात असे निरीक्षण न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी नोंदवले.
अल्पवयीन मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. तिला त्या मुलाशी लग्न करायचे होते. मात्र वडिलांनी त्यास विरोध केल्याने तिने पित्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत पित्याला अटक करण्यात आली. सत्र न्यायालयाने पित्याला दोषी ठरवत दहा वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजारांचा दंड ठोठावला. या शिक्षेला पित्याने हायकोर्टात आव्हान दिले. त्यावर न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. घटना घडल्यानंतर सात वर्षांनंतर पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली. या कालावधीत ही घटना पीडिता आपल्या आईला, भावाला सांगू शकली असती. पहिली पत्नी सोडून गेली असतानाही आरोपीने लग्न केले नाही. काही कालावधी नंतर पीडितेने आपल्या आईच्या आईला ही बाब सांगितली. पीडितेचे नकळत शब्द वगळता मुलांची, कुटुंबांची काळजी वाहणा ऱ्या पित्याविरोधात कोणताही पुरावा नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला व आरोपी पित्याची निर्दोष मुक्तता केली आहे.
z वडिलांना दारूचे व्यसन होते असे गृहीत धरले तरी ते खटल्याच्या बाजूने पुरेसे ठरणार नाही. याउलट वडिलाने पीडितेची आईच्या अनुपस्थितीत काळजी घेतली. तो कुटुंबातील एकमेव कमवता सदस्य होता. त्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले ही महत्त्वाची परिस्थिती असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.