जळगाव रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 13 वर, पाच रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक करणार चौकशी

आगीच्या अफवेमुळे लखनऊवरून मुंबईला निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी रेल्वे टॅकवर उडय़ा मारल्या आणि विरुद्ध दिशेने येणा ऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडले. या भीषण अपघातातील मृतांची संख्या 13 झाली आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबाबतची चौकशी करण्यासाठी आता रेल्वे बोर्डाने पाच रेल्वे अधिका ऱ्यांचे पथक नेमले आहे.

अनेकांचे धड वेगळे झाल्याने मृतदेहांची ओळख पटवताना अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत आठ जणांची ओळख पटल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले. मृतांमध्ये चार नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याचे जळगावचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले. चौकशी पथकामध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी, मुख्य सुरक्षा आयुक्त, मुख्य इलेक्ट्रिक अभियंता, मुख्य मेपॅनिकल इंजिनीअर, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक यांचा समावेश असून हे सर्वजण मध्य रेल्वे झोनचे आहेत.  हा अपघात नेमका कसा घडला याबाबत हे पथक चौकशी करणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे दिलीप कुमार यांनी सांगितले. मुख्य सुरक्षा अधिकारी याबाबतचा अहवाल लवकरात लवकर देतील असे ते म्हणाले.

प्रवासी का बाहेर पडले?; नेमके कारण शोधणार

प्रवाशांनी ट्रेनची चैन का खेचली याबाबतचे कारण शोधण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील धनराज नीला यांनी सांगितले. ट्रेन थांबल्यानंतर चाकातून ठिणग्या उडाल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु असे काही घडले नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले असून अफवा नेमकी कुणी पसरवली आणि कशामुळे प्रवासी रेल्वेतून बाहेर पडले, याचा तपास करणार असल्याचे रेल्वे अधिका ऱ्यांनी स्पष्ट केले आहे.