धार्मिक स्थळांवर भोंगे लावणे हा कोणत्याही धर्माचा अनिवार्य भाग नाही. ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याला धोका होतो. त्यामुळे लाऊडस्पीकरला परवानगी नाकारल्याने मूलभूत अधिकारांवर गदा येते, असा दावा कोणीच करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. सर्व धार्मिक स्थळांवरील भोग्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा, असे सक्त आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.
ध्वनी प्रदूषण करणा ऱ्या भोंग्यांना परवानगी नाकारणे हे जनहिताचेच आहे, असे न्या. अजय गडकरी व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठाने नमूद केले. लोकशाही असणा ऱ्या महाराष्ट्रात एखादी व्यक्ती किंवा समूह असा दावा करू शकत नाही की आम्ही कायद्याचे पालन करणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस बघ्याची भूमिका घेऊ शकत नाहीत, असा सज्जड दम न्यायालयाने दिला आहे.
भोगे जप्त करा, विश्वस्तांविरोधात गुन्हा नोंदवा
धार्मिक स्थळांवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार आल्यास तेथील प्रमुखांना नियमांचे पालन करण्याची ताकीद द्या. त्याच धार्मिक स्थळाबाबात दुसरी तक्रार आल्यास भोंगे जप्त करा. यासाठी जबाबदार असणारे विश्वस्त व प्रमुखांविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा, असे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना द्यावेत, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
आवाजाची मर्यादा वाढू देऊ नका
निवासी क्षेत्रात दिवसा आवाजाची मर्यादा 55 डेसिबल ठरवण्यात आली आहे तर रात्रीसाठी 45 डेसिबल आहे. ध्वनी प्रदूषण होत असेल तर नुसता एका भोंग्याचा किंवा लाऊडस्पीकरचा आवाज मोजू नका तर एकाच वेळी वाजवल्या जाणा ऱ्या सर्व लाऊडस्पीकर व भोंग्यांचा आवाज मोजा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
मोबाईल अॅपद्वारे आवाज मोजत रहा
आवाजाची मर्यादा मोजणारे अॅप सहज उपलब्ध होते. या अॅपद्वारे प्रत्येक विभागातील आवाजाच्या मर्यादेवर लक्ष ठेवा. ध्वनी प्रदूषण करणाऱयांवर तातडीने कारवाई करा, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले.
मशिदीवर भोंगे असल्याने कारवाई नाही
मशिदीवर भोंगे लावण्यात आले आहेत. त्यामुळे होणा ऱ्या ध्वनी प्रदूषणावर कारवाई करता येणार नाही. हा संवेदनशील मुद्दा आहे. तुम्ही तक्रार मागे घ्या, असे पोलिसांनी आम्हाला सांगितले होते. महत्त्वाचे म्हणजे मशिदीवरील भोंग्यांना पोलीस परवानगी देण्यात आलेली नव्हती, असे संघटनेने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.