गँगस्टर डी. के. रावसह सात जणांना अटक

एका वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटींची खंडणी मागत त्याचे हॉटेलदेखील हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात गँगस्टर डी. के. राव याच्यासह अन्य सहा जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली.

व्यावसायिक रामदास विश्वकर्मा (74) यांच्या तक्रारीवरून गँगस्टर डी. के. राव तसेच अब्दुल्ला हसन अब्बु, अबू बकर सिद्दिकी, फारुख, आसिफ दरबार, इम्रान शेख, रियाज शेख, जावेद खान, हनिफ नाईक अशा सहा जणांविरोधात खंडणीसाठी धमकावणे, हॉटेल हडपण्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा पुढील कारवाईकरिता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच तपास सुरू करून शीव येथे डी. के. राव याला पकडले. तसेच सहा जणांनादेखील पकडण्यात आले.