वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये (व्हीएसआय) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शेजारची खुर्ची टाळली. अगोदर व्यासपीठावर येत त्यांनी स्वतःच्या हाताने नेमप्लेट बदलून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवार यांच्या शेजारी बसवले. त्यामुळे व्हीएसआयच्या कार्यक्रमात संगीत-खुर्चीचा प्रत्यय उपस्थितांना आला.
एवढेच नव्हे, तर बाबासाहेब पाटील भाषणाला उठल्यानंतर त्या खुर्चीवर अजित पवार यांची नेमप्लेट ठळकपणे दिसत होती. तीदेखील नंतर अजित पवारांनी हळूच काढून खुर्चीच्या मागे टाकली.
व्हीएसआयच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सर्वसाधारण सभेसाठी अजित पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुभंगलेले नेते या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. प्रोटोकॉलप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शेजारी अजित पवार यांची खुर्ची होती. त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे नाव होते. शेजारीच जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात अशी रांग होती.
कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी अजित पवार यांनी स्टेजवर अगोदरच येऊन शरद पवार यांच्या शेजारील त्यांच्या नावाची पाटी उचलून दुसरीकडे ठेवली आणि शरद पवार व त्यांच्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवली. हा प्रकार उपस्थितांच्या नजरेस आला. त्यानंतर बाबासाहेब पाटील भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांच्या खुर्चीवर अजित पवार अशी नेमप्लेट असल्याची गोष्ट अजित पवार यांच्या नजरेस आली. संस्थेचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांना त्यांनी काही बोलण्यासाठी बोलवून घेतले. ते खाली वाकले एवढय़ात अजित पवार यांनी स्वतःच्या हाताने ती नेमप्लेट काढून खुर्चीच्या मागे टाकून दिली.
शरद पवार यांच्या शेजारील खुर्ची टाळल्याबद्दल अजित पवार यांना थेट विचारले असता ते म्हणाले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवार यांच्याशी बोलायचे होते. म्हणून त्यांना शेजारची खुर्ची दिली. माझा आवाज हा दोन-तीन खुर्च्या ओलांडून दूर जाऊ शकतो म्हणून मी दूर बसलो.
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे रिकव्हरीचा विचार नाही
‘लाडकी बहीण’ योजनेचे निकष धुडकावून ज्या महिलांनी लाभ घेतला आहे किंवा ज्या महिला अपात्र असताना त्यांनी अर्ज केला होता त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा होत होती. मात्र यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैसे रिकव्हरीचा अजिबात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.
शरद पवार–अजित पवार यांची अर्धा तास चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर व्हीएसआयमध्ये आले. ते थेट संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या केबिनमध्ये गेले. सुमारे अर्धा तास ते केबिनमध्येच होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. कार्यक्रम संपल्यानंतर या चर्चेबद्दल अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, साखर उद्योग, इथेनॉल, साखर कारखानदारीचे प्रश्न, प्रामुख्याने ऊर्जा, कृषी, उत्पादन शुल्क आणि सहकार या खात्यांशी संबंधित त्याचबरोबर संस्थेची विस्तार वाढ, नवे प्रकल्प आणि अनुषंगिक बाबींवर चर्चा झाली.