हिंदुस्थानी युवतींनी विजयाची हॅटट्रिक साजरी करीत 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुपर सिक्समध्ये धडक दिली. ‘अ’ गटातील तिसऱ्या लढतीत हिंदुस्थानी महिलांनी श्रीलंकेचा 60 धावांनी धुव्वा उडवित आपली विजयी मालिका कायम राखली. 49 धावांची खेळी करणारी त्रिशा गोंगाडी या विजयाची शिल्पकार ठरली.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 9 बाद 58 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून रश्मिका सेववंडी (15) वगळता इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाहीत. हिंदुस्थानकडून शबनम शकिल, व्ही. जे. जोशिथा व पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. आयुषी शुक्ला व वैष्णवी शर्मा यांनी 1-1 बळी टिपला.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी महिलांनी 9 बाद 118 अशी धावसंख्या उभारली. यात सलामीवीर त्रिशा गोंगाडीने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तिने 44 चेंडूंत 5 चौकारांसह एक षटकार ठोकला. कर्णधार निकी प्रसाद (11), मिथिला विनोद (16) व व्ही.जे. जोशिथा (14) या इतर दुहेरी धावा करणार्या फलंदाज ठरल्या. श्रीलंकेकडून प्रमुदी मेठसारा, लिमांसा तिलकरत्ने व असेनी थलागुणे यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. रश्मिका सेववंडी, चमोडी प्रबोदा व मनुडी नानयक्कारा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
वेस्ट इंडीजचीही आगेकूच
विंडीजच्या महिला संघाने मलेशियाचा 59 धावांनी पराभव करीत 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुपर-6 मध्ये धडक दिली. विंडीजने ‘अ’ गटात एक विजय व दोन पराभवासह तिसऱया स्थानासह आगेकूच केली. दुसरीकडे पराभवाच्या हॅटट्रिकसह मलेशियन संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. वेस्ट इंडीजने 7 बाद 112 धावा केल्या. विंडीजकडून असाबी पॅलेंडर (30), जहझारा क्लॅक्सटन (19) व अबीगेल ब्राइस (14) यांनी दुहेरी धावा केल्या. मलेशियाकडून सिती नझवाह व नूर इझ्झातुल सायफिका यांनी 2-2 विकेट मिळवले.