वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव संस्मरणीय केल्यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) ‘फिफ्टी इअर्स ऑफ वानखेडे स्टेडियम’ हे वाक्य 14505 लाल आणि पांढऱया लेदर चेंडूंचा वापर करत लिहिले आणि आपल्या चेंडू विक्रमाची ‘गिनीज बुका’त नोंद केली. क्रिकेटच्या लाल आणि पांढऱ्या चेंडूंचा वापर करून लिहिलेले हे आजवरचे सर्वात मोठे वाक्य ठरले आहे.
हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासातील अनेक सुवर्णक्षणांचा सोबती असलेल्या वानखेडे स्टेडियमवर 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 ते 29 जानेवारी 1975 या दरम्यान पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. त्या सामन्याची पन्नाशी साजरा करण्यासाठी एमसीएने आजचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच दिवसाची आठवण ताजी करण्यासाठी एमसीएने आज हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी आजचा पराक्रम त्या सामन्यात शतक झळकावणारे एकनाथ सोलकर आणि असामान्य कामगिरी करणाऱया अन्य खेळाडूंना अर्पण केला.