पालकांनो लक्ष द्या! ऑनलाईन लैंगिक छळाचे बळी वाढले!

इंटरनेट आता शहरांपासून ग्रामीण भागात पोहोचले आहे. त्यामुळे अनेकांच्या हातात स्मार्टफोन आला आहे. परंतु, इंटरनेट हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून ते अनेक गुह्यांचे साधनही बनले आहे. जगभरातील 12 पैकी एक बालक कधीतरी ऑनलाइन लैंगिक शोषणाचे बळी ठरले आहे, अशी धक्कादायक माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि चायना अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2010 ते 2023 या कालावधीत केलेल्या 123 अभ्यासांचे विश्लेषण केले असून ज्यामध्ये असे आढळले की जगभरातील आठ मुलांपैकी एकाला ऑनलाइन लैंगिक शोषणाचा फटका बसला आहे. जागतिक स्तरावर 12 पैकी एका मुलाने मागील वर्षात किमान एका प्रकारचा ऑनलाइन लैंगिक शोषण किंवा गैरवर्तन अनुभवला आहे. जागतिक स्तरावर इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अशा प्रकरणांमध्ये झपाटय़ाने वाढ झाली आहे, ज्यात पोर्नोग्राफी, सेक्सटिंग आणि ऑनलाइन ग्रूमिंग तसेच फोटोसोबत छेडछाड करणे यांचा समावेश आहे.

मुली अधिक असुरक्षित

मुली या मुलांपेक्षा अधिक असुरक्षित आहेत. या अभ्यासाने केवळ सतर्क केले नाही तर प्रत्येक पालकांना अलर्ट केले आहे. जे पालक आपल्या निष्पाप मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी मोबाइल आणि इंटरनेट वापरण्याची परवानगी देतात. डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने 18 वर्षाखालील मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.