हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं अशी मागणी जगातल्या तमाम हिंदुंची आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राट. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या केंद्र सरकारने त्यांची उपेक्षा केली असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे. बाळासाहेबांच स्माकर उभं राहतंय. शिवतीर्थावरच्या महापौर बंगल्यावरचे त्यांचे स्मारकाचे लवरकरच लोकार्पण होईल. 2026 पासून बाळासाहेबांचं जन्मवर्ष सुरू होणार आहे. या निमित्ताने आतापर्यंत बाळासाहेबांसाठी काही मागितलं नव्हतं. पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या लोकभावना आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात यावं अशी फक्त शिवसेनेचीच नव्हे तर तमाम महाराष्ट्राच्या, देशभरातल्या, जगभरातल्या हिंदुंची मागणी आहे. आज व कालपासून शिवसेनेच्या संघटनांनी ठराव मंजूर केले आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावं. खरं म्हणजे 12 वर्षात ही मागणी या व्यासपीठावर कधी झाली नाही. पण आमच्या सर्व खासदारांनी संसदेत ही मागणी केली होती. गेल्या 12 वर्षात या मोदी सरकारने मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना भारतरत्न दिल्याचं आमच्या लक्षात आहे. कुणाचे नाव घेऊन आम्हाला अपमान करायचा नाही, पण ज्यांना राज्यात सुद्धा कोणी ओळखत नाही अशा लोकांना भारतरत्न देऊन त्यांनी आपला राजकीय स्वार्थ पूर्ण केला. पण ज्यांनी या देशातल्या हिंदुंना महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अस्मिता दिली. ज्यांच्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. अशा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. तेव्हाही त्यांना मी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा खरंच सन्मान करायचा असेल तर ट्विटरवर आदरांजली अर्पण करण्याऐवजी त्याच ट्विटरवर शिवसेनाप्रमुखांना भारतरत्न देण्याचं जाहीर करावं. आणि ती महाराष्ट्राची, तमाम हिंदुस्थानाची मागणी आहे, ती मान्य करावी असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी करण्याची गरजच नाही, या सरकारला कळत नाही का? हा केंद्र सरकारचा विषय आहे. पद्म पुरस्कार मिळवण्यासाठी सरकारकडे शिफारस करावी लागते. भारतरत्न देण्यासाठी शिफारस ते करू शकतात. पण भारतरत्न, पद्मविभुषण हा दुसरा सन्मान आहे. हा पुरस्कार देण्याच पूर्ण अधिकार देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना असतो. आतापर्यंत भारतरत्नाची जी यादी तुम्ही पाहिली असेल त्यात ज्यांना राज्यातून शिफारस करण्याची गरज नव्हती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना कुठल्या राज्याने शिफारस केली होती? सर्वपल्ली राधाकृष्णन, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, स्वामीनाथन, लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी यांना कोणत्या राज्याने शिफारस केली. कुणीही भारतरत्नासाठी शिफारस करत नाहीत. हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असतो आणि त्याचा निर्णय केंद्र सरकारची एक समिती आहे. किंवा हा संपूर्ण विषय हा गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयातला निर्णय आहे. फक्त ट्विट करण्यापेक्षा आणि इथे येऊन भाषणात बाळासाहेबांबद्दल आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा भारतरत्न देऊन सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असेही संजय राऊ यांनी सांगितले.
वीर सावरकरांना हा सन्मान मिळावी ही मागणी आम्ही सभागृहात आणि बाहेरही केली आहे. सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही कारण सावरकरांवरचं त्यांचं प्रेम हे ढोंग आहे. त्यांचे हिंदुत्व ढोंगी आहे. हिंदुत्वासाठी दोन नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केलेले आहेत ते म्हणजे वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान म्हणजे वीर सावरकरांचाही सन्मान आहे. वीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे नेला. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन हिंदुहृदयसम्राट आहेत त्यांची हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या केंद्र सरकारने उपेक्षा केली आहे. वीर सावकरांना भारतरत्न मिळावी ही मागणी आम्ही भाजपसोबत असतानाही करत होतो आणि आताही करतोय. तुम्ही जर जुना इतिहास पाहिला तर वीर सावरकरांचा यथोचित सन्मान करावा अशी मागणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तसं नसतं तर एवढं मोठं स्मारक उभं राहण्यासाठी सहकार्य केलं नसतं. वीर सावरकरांच स्मारक हे फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच उभं राहिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे महानगरपालिकेचे नेते नव्हते, ही जगातल्या हिंदुंची मागणी आहे असेही संजय राऊत यांनी नमूद केले.