पुण्यात व्यासपीठावर रंगली काका-पुतण्यात संगीतखूर्ची, अजित पवार म्हणाले, ‘माझा आवाज…’

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी एकाच मंचावर आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त काका-पुतणे एकाच मंचावर आले होते. बैठक व्यवस्थेनुसार शरद पवार यांच्या बाजुलाच अजित पवार यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचे नावाची चिठ्ठी खूर्चीवर चिकटवण्यात आली होती. मात्र कार्यक्रम सुरू होण्याआधी व्यासपीठावर संगीतखुर्ची रंगली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसणे टाळले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार अनेकदा एका मंचावर आले आहेत. मात्र दोघांमध्ये संवाद झाल्याचे दिसून आले नव्हते. गुरुवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोघांच्याही खुर्च्या शेजारी-शेजारी होत्या. मात्र अजित पवारांनी शरद पवार यांच्याशेजारी बसण्याचे टाळले. अजित पवार यांनी आपली जागा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना दिली आणि एक खूर्ची सोडून ते बसले. याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरणही दिले.

व्यासपीठावरील संगीतखूर्चीबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना साहेबांशी काहीतरी बोलायचे होते, म्हणून त्यांना मधी बसवले. मी साहेबांशी कधीही बोलू शकतो. माझा आवाज दोन खुर्च्या सोडून तिसऱ्यालाही ऐकू जातो.’

दरम्यान, गेली दोन वर्ष अजित पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दांडी मारली होती. याबाबत विचारले असता अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. ‘मी कामात होतो आणि माझे आमदार जास्त कसे येतील याचा विचार करत होतो’, असे उत्तर दिले.