विज्ञान कथांवरील एआयचे गारुड

>> स्मिता पोतनीस

दादा कोंडकेंची ‘ए आये’ ही हाक जितकी परिचित तितकाच आता सगळ्यांना ‘एआय’ हा शब्द परिचित आहे. एआय या प्रगत तंत्रज्ञानाने आजच आपल्या जीवनावर प्रभाव टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे विज्ञान कथा त्याच्या प्रभावाखाली न आल्या तरच नवल! मग त्यात पुन्हा त्या भविष्यवेधी कथा. त्यामुळे एआयच्या आजच्या संकल्पनेचे विविधांगी परिणाम दाखवले जातायत.

ए आय लेखकाच्या नजरेला कसा दिसतो आणि वाचकाला तो कसा दाखवला जातो ते पाहण्यासारखे आहे. एआयच्या चित्रणात दोन भाग झालेले दिसून येतात. एकतर तो अतिशय चांगला, समजूतदार, परोपकारी असतो, नाहीतर माणसांवर राज्य करायला उद्युक्त असलेला असा दाखवला जातो. एआय रोबोट माणसाला मात देऊन माणसांवर अधिराज्य गाजवणार तर नाही, ही भीती माणसाच्या मनात वसते. ती भीती त्या गडद चित्रणातून बाहेर येते आणि मुळात रोबोट, एआयची निर्मिती ही माणसाला मदत करण्यासाठी केलेली आहे. तेव्हा त्याने तेच काम इमानदारीत करून आदर्श राहावं ही इच्छा त्याचं चित्रण आदर्श करतं.

एआय रोबोट्सचं मानवी होणं म्हणजे नेमकं काय ? मानवी होणं म्हणजे फक्त त्यांच्यात भावना रोपित केल्या जातील तेव्हा ते मानवी होतील? ते हसतील व रडतीलही, पण त्यांना माणसातली नाती कळतील ? त्यातला भावनेचा आतून ओलावा जाणवेल ? लेखकाच्या दृष्टीने नक्कीच जाणवेल. भविष्यात ते होईलही, पण फक्त म्हणूनच त्यांना मानवी म्हणायचं का? त्यांच्यात भावना आल्या तर त्यांना ते माणसाचे गुलाम म्हणून निर्माण केलेले आहे हे कळल्यावर त्यांच्या भावना काय असतील ? त्यांना मानवी दाखवण्याचे, करण्याचे प्रयत्न होतात, पण त्यांना मानवी होण्याचा अधिकार दिला जाणार का? हा प्रश्नही लेखक विचारतात.

ज्या वेळी सर्जनशीलतेसाठी एआयचा उपयोग केला जातो, तेव्हा ते लेखक,चित्रकार, कोणत्याही कलाकारावर मात करेल का? सृजन माणसाच्या निरीक्षणातून, मनाच्या तरलतेतून, अनुभवातून, आलेल्या विचारातून, केलेल्या वा मनात उमटलेल्या कल्पनेतून, प्रेरणेतून साकार होतं. तीच प्रोसेस एआयबाबत असते? ते संगणकीय संश्लेषणाचे परिणाम देतात. थोडक्यात एआय त्याच्यासमोर पसरलेल्या विशाल डेटातून सर्जनशील प्रक्रिया करून त्यातून काही वेचून देते. त्याला नक्कल म्हणावी का? की संपादित म्हणावी हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. या वर्षभरात आलेल्या विज्ञान कथात ६० टक्क्यांच्या वर कथा एआयवर आहेत. त्यात एआयकडून लिहून घेतलेल्या कथांचा अंक आलेला दिसून येतो. सृजनात एआयने आता पाऊल ठेवलेय. सध्या तरी लेखकांना एआयपासून वाटणारी भीती फारशी खरी ठरलेली दिसून आली नाही. कारण माणूस अनुभवाने कथा खुलवतो, पण एआयने लिहिलेल्या कथातून कोरडेपण जाणवतं, पण लेखकांनी वदवलेल्या भविष्यानुसार एआय एखाद्या लेखकाची शैली अनुसरून त्यानुसार जर लेखन करायला लागला तर लेखकाचं लेखन आणि एआयचं लेखन यातून भेद उकलता येईल ?

मोबाईलवर एखाद्या वस्तूची जाहिरात बघितली आणि फक्त मनाशी ती घ्यावी का, हा विचार आला तरी एआय अचूक तो पकडू शकतो आणि मग सतत तीच गोष्ट पुनः पुन्हा नजरेसमोर आणून ती घ्यायला उद्युक्त करतो. एआयमुळे आपण विविध सोशल मीडियाशी व्यसनासारखे चिकटतो. आता त्याच्याकडून मार्केटिंगचं तंत्र आत्मसात करावं की, एआयच्या तंत्राने घाबरावे हे माणसालाच ठरवायला लागेल. एआयपासून आपली प्रायव्हसी सुरक्षित नाही. एआयला काळाचं बंधन नाही. त्यामुळेच ते इतिहासातील भाषाही आत्मसात करू शकेल. तसं झालं तर जीवनाचं रहस्यही माणसासमोर उघड होऊ शकेल. विज्ञानाशी संलग्न एआय अध्यात्माशी जोडलं जाईल? त्यानं जर मनःशांती मिळायला लागली तर त्याचं श्रेय कोणाला दिलं जाईल? आता हे योग्य की अयोग्य हे कसं ठरवणार? माणूस आणि झाड यांच्यातील नात्याला खतपाणी घालणं आणि इतर माणसं समजू शकणार नाहीत त्या भावना एआय समजून घेऊन जपेल हे शक्य होईल.

माणसाने एआयच्या मदतीने भ्रष्टाचार केला तर? माणूस भ्रष्टाचाराशिवाय राहू शकेल ? पण त्याच एआयच्या सहाय्याने त्यांची पोल खोलताही येऊ शकते. एआयमार्फत माणसांना नजरकैदेत ठेवता येऊ शकतं. नजरकैद म्हणावं की गुलाम करणं ही विचार करण्यासारखी गोष्ट असेल. एआय संचलित कार चालवताना जर अपघात झाला तर त्यासंबंधित लोकांना न्याय द्यायचा कसा ? एआयची नैतिकता माणसांच्या नैतिकतेच्या व्याख्येत कशी बसवणार? ह्युमन डिजिटल ट्विन तयार केला तर तो माणसाच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला सांभाळेल ? माणसाच्या आयुष्याचा सगळा डेटा त्याच्यापाशी असल्यावर त्याच्यातलं कौशल्य आणि प्रामाणिकता यातलं तो काय घेईल? प्रामाणिकता ही नैतिकता त्याला कळेल ? की कौशल्याचा वापर तो गैरकामासाठीही करेल? अशा सगळ्या कल्पना एआय या संकल्पनेभोवती विविध लेखक, लेखिकांनी गुंफल्या. यातल्या किती खऱ्या होतील व किती कल्पनेतच राहतील माहीत नाही. एआयला आपण कशा प्रकारे वापरू की, त्याला आपल्याला वापरू देऊ यावर त्याचं आणि आपलं भवितव्य अवलंबून आहे.

potnissmitag gmail.com 
(लेखिका विज्ञान कथा लेखक आणि अभ्यासक आहेत.)