Artificial Intelligence – लष्कर आणि एआय

>> एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले

आर्मीने नुकतेच ‘नो युवर आर्मी’ हे प्रदर्शन पुण्यात आयोजित केले होते. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेले रोबोटिक डॉग, डूब्ज अशा महत्त्वपूर्ण गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. या सगळ्या वस्तू म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहेत. युद्धजन्य परिस्थितीमध्ये याचा प्रत्यय आपल्याला येतो. रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध झाले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर झालेला दिसला. ‘लव्हेंडर’ नावाचे सॉफ्टवेअर तयार करून आवाज रेकॉर्ड करणं, काही फोटो मिळविणे, टेलिफोन, मोबाईल फोनमधील डेटा वापरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे माहिती मिळविणे आणि त्यानंतर निर्णय घेणे यासाठी एआयचा मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला दिसला.

जेव्हा कारगील युद्ध झाले तेव्हा कोणता टास्क डेंजर आहे, परिस्थिती कशी हाताळली पाहिजे, युद्धजन्य स्थिती असताना निर्णय कसा घ्यायला हवा, आपलं टार्गेट कसं साध्य करायला हवं हे लक्षात घेताना मॅपिंगचा खूप उपयोग झाला. जोखमीच्या घटना समोर येतात तेव्हा गुगल मॅपिंग, ड्रोन फोटो यांचा उपयोग करून घेणे हा एआयचाच भाग आहे. सायबर अटेंक, शत्रूच्या विमानाचे टार्गेट रिकग्नेशन करायचे असेल तर ड्रोन फोटो या माध्यमातून एआयची मदत होते, पण हा वापर सुलभपणे व्हायला हवा. यामध्ये सुरक्षितता हवी. सध्या मात्र एआयवर नियंत्रण दिसत नाही.

अचूक हल्ल्यांसाठी इंटेलिजन्स खूप महत्त्वाचा ठरतो

सर्जिकल स्ट्राईकसाठी अचूक माहिती असल्याशिवाय धाडस दाखवणे अंगलट येऊ शकते. माहिती गोळा करण्याचे अनेक मार्ग असतात. इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स महत्त्वाचा असतो. त्यासाठी शत्रूच्या ठिकाणांचे इमेजिंग, फोटो रेकग्नेशन, सॅटेलाईट इन्फॉर्मेशन, शत्रूच्या हालचाली टिपणे आवश्यक असते. विमानांचे कॅमेरे, सॅटेलाईट कैमेरे, थर्मल इमेजिंग आदी माध्यमातून माहिती मिळवली जाते. आता आपल्या एअरफोर्सने ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केले याचा अर्थ असा की, ही सगळी माहिती आधी आपल्याकडे होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादी अनुधावर किती दहशतवादी होते, तिथे शस्त्रास्त्रे, दारूगोळ्याचा साठा किती होता याची खात्री पटल्याखेरीज असा हल्ला केला जात नसतो. शिवाय अशा हल्ल्यांचा परिणाम नागरिकांवर होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. आता ओपन इंटेलिजन्स खूप झाले आहेत. निरनिराळ्या पद्धतीने डेटा मिळविला जात आहे. आपली प्रायव्हसी कमी झाली आहे. व्यक्तिगत माहिती, गुप्तचर खात्यातली माहिती ही लीक होणं हे धोकादायक आहे. त्यावर नियंत्रण असलेच पाहिजे. त्यासाठी नियमावली आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सेफ प्रोटोकॉल असले पाहिजेत. नाहीतर डेटा लीक होणं योग्य नाही. म्हणजेच एआय जसे फायद्याचे तसेच त्याचा वापर करताना त्यावर नियंत्रणही असलं पाहिजे.

– शब्दांकन : मेधा पालकर