>> वैष्णवी पुरंदरे
इंटरनेट आणि संगणक क्रांतीचा काळ जुना वाटावा इतक्या प्रचंड वेगाने आज चॅट जीपीटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) यांनी जगाच्या अनेक क्षेत्रांत प्रभाव गाजवायला सुरुवात केली आहे. शिक्षण याला अपवाद नाही. इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नवनवीन शोधांमुळे ज्ञानार्जन करण्याची ऑफलाइन आणि ऑनलाइन असंख्य साधने निर्माण झाली आहेत. ज्ञान आणि ज्ञानाचा आशय असलेली माहिती आता केवळ क्लासरूमपुरती मर्यादित नाही. अशा या वेगाने बदलणाऱ्या ज्ञानार्जनाच्या पद्धतीत अभ्यासक्रमाची केवळ सूचना आणि स्पष्टीकरण व माहितीचे वितरण एवढीच शिक्षकाची भूमिका आता राहिलेली नाही. ज्ञानदानाबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनाला उपयोगी (लाईफ रेडी) अशी कौशल्ये शिकविणे आता आवश्यक ठरणार आहे.
गेल्या तीन दशकांत भारतात तंत्रज्ञानात्मक विकास विशेषतः इंटरनेट आणि संगणक यांचा प्रसार अफाट वेगाने झाला. 15 ऑगस्ट 1995 रोजी भारतात इंटरनेट सुविधा प्राप्त झाली. सन 2004 मध्ये भारतात गुगलचा प्रारंभ झाला. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या भारतात आज 94 कोटी आहे. सन 2008 मध्ये अँड्रॉइड स्मार्टफोन भारतात आला. 2023 मध्ये एक अब्ज लोकांकडे फोन कनेक्शन होते. यापैकी ६० कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. चॅट जीपीटी नोव्हेंबर 2023 मध्ये आले. जीपीटीचा वापर करणाऱ्यांची भारतातील संख्या एका वर्षात 18 कोटी झाली. भारतातच आता जीपीटीआधारित अनेक मॉडेल्स उदाहरणार्थ भारत जीपीटी, किसान जीपीटी येत आहे. अमेरिकेनंतर जीपीटी वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. जीपीटीला आपण प्रश्न विचारू शकतो आणि तो लगेच उत्तरे देतो. मागणी करताच कोणत्याही विषयावर मग तो निबंध असो की कविता, गोष्टी असो की गणिती प्रमेय, विज्ञान असो की तत्त्वज्ञान सर्व प्रश्नांची उत्तरे ‘टेक्स्ट’ स्वरूपात जीपीटी देतो. विशिष्ट क्षेत्राविषयी सांगोपांग माहिती देणाऱ्या जीपीटीची या पुढील काळात चलती असेल. सारांश, ज्ञानार्जनाचे असंख्य मार्ग आता विद्यार्थ्यांसमोर आहेत. गुगल आणि व्हॉट्सअॅपवरही आता जीपीटी सेवा निःशुल्क मिळते.