>> प्रभाकर पवार
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने फसवणूक ओळखणे शक्य आहे. परंतु प्रतिबंधात्मक काय? डिजिटल मिशनचे काय झाले ? आज सायबर माफिया तुमचे बँक खाते कधी साफ करतील याची खात्री नाही. आता तर ‘एआय’चे कोलित त्यांच्या हातात मिळाले आहे. त्यामुळे एआय शाप की वरदान ? हे काळच ठरवणार आहे.
नवीन वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय, Artificial Intelligence) वर्ष म्हणून जाहीर झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक विज्ञानाचीच एक शाखा आहे. आपणास प्रख्यात अभिनेता रजनीकांत यांच्या (2010 साली) ‘रोबोट’ या चित्रपटामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची झलक पाहवयास मिळाली होती. त्यात सुपर ह्युमनमध्ये किती ताकद व क्षमता असते हे दिसून आले होते. भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेची ही उपयुक्तता ओळखून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलली आहेत.
भारताला नवकल्पना, नीतिमत्ता आणि शिक्षणामध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर व सक्षम बनवायचे आहे. त्यासाठी देशातील चार कोटी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देण्यात येणार आहे. भारताला संशोधन व विकासात आघाडी हवी आहे. यंत्रयुगाचा प्रारंभ झाल्यापासून विज्ञान व तंत्रज्ञान नवीन स्तरावर पोचले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने वाढला आहे. यापुढे तो अजून वाढणार आहे. मानवाचा विकास व्हायला लाखो वर्षे लागली. परंतु गेल्या 10 वर्षांत तंत्रज्ञानाने जी क्रांती केली आहे त्यामुळे भविष्यात माणसाला कामच उरणार नाही. सारे काही यंत्रमानवच करेल. कृत्रिम बद्धिमत्तेमळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढेल. फसवणुकीचे प्रकार रोखणे कठीण जाईल. ‘डीप फेक’ हे या आधुनिक तंत्रज्ञान युगातील एक भयंकर शस्त्र मानले जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे ‘डीप फेक’ मध्ये बदल करण्यात येतो. बनावट व्हिडीओ, ऑडियो बनवून महिलांना ब्लॅकमेल करता येते. मध्यंतरी बॉलीवूड अभिनेत्री काजोल, कतरिना, रश्मिका मंदाना या अभिनेत्रींचे अश्लील व्हिडीओ तयार करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
एका बड्या उद्योगपतीच्या मुलाचाही अलीकडे डीप फेक व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्यात आला होता. गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फेक व्हिडीओची त्या उद्योगपतीने मुंबई क्राइम ब्रँचच्या ‘सायबर सेल ‘कडे तक्रार केली आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मॅनेजिंग डायरेक्टर सुंदररमन राममूर्ती यांच्या नावाने ही ‘डीप फेक’ व्हिडीओ तयार करून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे अलीकडे उघड झाले होते. हे सारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे करण्यात येत असून याचा जास्त फटका महिलांना बसत आहे. ‘डीप फेक’ व्हिडीओ तयार करून ९० टक्क्यांपेक्षाही अधिक महिलांची बदनामी करण्यात येत आहे. ‘डीप फेक’चा वापर मोठ्या प्रमाणात ‘पोर्नोग्राफी’ व खंडणी वसुलीसाठी केला जातो. महिलांचे अगदी हुबेहुब फोटो डीप फेकमध्ये दाखवले जातात. परंतु ते बनावट असतात. याविरुद्ध जर कडक नियम केले गेले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे जरी असले तरी तोटेही अधिक आहेत. डीप फेकचा वापर निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. राजकीय पुढाऱ्यांना बदनाम केले जाते. जातीय तेढ निर्माण करण्यासाठी ‘डीप फेक’चा वापर केला जातो. रशिया व युक्रेन युद्धाच्या वेळी ‘डीप फेक ‘चा वापर केला गेला. त्यामुळे हिंसाचार वाढला.
सायबर माफिया ‘डिजिटल अटकेची भीती दाखवून देशभरात करोडो रुपयांची लूट करीत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीस लागावी म्हणून जे काही प्रयत्न सुरू आहेत त्यातून धोकाच अधिक संभवत असल्याचे बऱ्याच तज्ज्ञांचे मत आहे. त्यात तथ्यही आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्याने उत्पादन क्षमता प्रचंड वाढेल. अपघातांचे प्रमाण कमी होईल. 90 टक्के मृत्यू घटतील. कारण रस्त्यावरील ‘एआय’ कॅमेऱ्यांमुळे वेगाने गाड्या हाकणाऱ्यांवर खूप मोठा दंड आकारला जाणार आहे. गंभीर आजाराचे अंदाज आधीच बांधता येतील. त्यामुळे वृद्धांची आयुमर्यादा वाढेल; परंतु माणसं किंवा मालक यंत्राची गुलाम होतील हे लक्षात ठेवा. आता एआय, चॅट जीपीटी व जेमिनीचा जमाना आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या वर्षात टेक्नो सॅव्ही तंत्रज्ञानी तरुणांना नोकऱ्यांची संधी आहे. शेवटी यंत्राचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर माणसाकडेच राहणार आहे.