अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती आणखी एक पुरावा लागला आहे. सैफवर ज्या चाकूने हल्ला करण्यात आला त्याचा तिसरा तुकडा पोलिसांनी जप्त केला आहे.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने वांद्रे तलावात तो तुकडा फेकला होता. बुधवारी पोलीस मोहम्मद शरीफुल इस्लामला घेऊन वांद्रे तलावाजवळ गेले होते. पोलीस त्या चाकूच्या तुकड्याचा तलावाजवळ शोध घेत होते. अखेर तो चाकूचा तिसरा तुकडा पोलिसांना सापडला आहे. पंचनाम्याच्या कारवाईनंतर पोलिसांनी चाकूचा तिसरा तुकडा ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनही तैनात करण्यात आली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यासाठी मोहम्मद शरीफुलने चाकूचा वापर केला होता. घटनास्थळी चाकूचा एक तुकडा आणि दुसरा तुकडा सैफ अलीच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला, तर चाकूच्या खालच्या बाजूची मूठ असलेला भाग पोलिसांना मिळाला नव्हता. चाकू हा महत्त्वाचा पुरावा असल्याने पोलिसानी चाकूचा तुकडा शोधण्यावर भर दिला होता. मोहम्मद शरीफुलने वांद्रे तलावात चाकूचा तुकडा फेकल्याची कबुली दिली होती. त्यामुळे बुधवारी पोलीस मोहम्मद शरीफुल इस्लामला घेऊन वांद्रे तलावाजवळ गेले होते.
सैफ अली खानवर 16 जानेवारीला मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्या घरात चोर शिरला होता. सैफची त्याच्याशी बाचाबाची झाली आणि यादरम्यान घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि यात त्याच्या मानेला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्या असून त्यापैकी दोन जखमा खोल झाल्या होत्या.