कॅलिफोर्नियात पुन्हा अग्नीतांडव, 31 हजार नागरिकांना घरे रिकामी करण्याचे निर्देश

कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा अग्नीतांडव सुरू झाले आहे. लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील कॅस्टेइक लेकजवळ जंगलाला आग लागली आहे. या आगीत 8 हजार एकरपेक्षा अधिक परिसर जळून खाक झाला आहे. जोरदार वारे आणि सुकलेल्या झुडुपांमुळे आग वेगाने पसरत आहे. आगीमुळे 31 हजार लोकांना घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच फ्री वे ची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

कॅलिफोर्निया अग्निशमन विभाग आणि एंजेलिस राष्ट्रीय वन कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. हेलिकॉप्टर आणि मोठी विमाने आग विझवण्यासाठी पाणी आणि रिटार्डेंट टाकत आहेत.

आगीमुळे स्थानिक लोकांना घरे सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कास्टेइकमधील पिचेस डिटेन्शन सेंटर रिकामे करण्यात आले असून सुमारे 500 कैद्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच परिस्थिती आणखी बिकट झाल्यास 4,600 कैद्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू असल्याचे लॉस एंजेलिस काउंटी शेरीफने सांगितले.