Chhatrapati Sambhaji Nagar – डोक्यात वार करून ट्रकचालकाची हत्या!

सोलापूर-धुळे रस्त्यावर बेवारस ट्रकमध्ये ट्रकचालक-मालकाची निघृण हत्या करून केबिनमध्ये मृतदेह दडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार, 22 रोजी पहाटे तीन वाजता उघडकीस आला. विजय मुरलीधर राऊत (52, रा. शाहूनगर, केडगाव, अहिल्यानगर) असे मृत ट्रकचालक-मालकाचे नाव असल्याचे समोर आले आहे.

गोपीनाथ डोंबाळे हे धुळे-सोलापूर रोडने जात असताना त्यांना एक बेवारस ट्रक आढळला. ट्रकमधून उग्र वास येत असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी ट्रकची केबिन पाहिली असता, त्यात विजय राऊत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक समाधान पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घाला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले.

हा मृतदेह अहिल्यानगरातील केडगाव, शाहुनगर येथील विजय मुरलीधर राऊत यांचा असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. हा ट्रक मयत राऊत यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले. राऊत हे 19 जानेवारी रोजी ट्रकमधून लोखंडी छोटे पाईप घेऊन रायपूरहून अहिल्यानगरकडे येत होते. मात्र, धुळे सोलापूर हायवेवरील हॉटेल न्यू मोहटादेवीसमोर त्यांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांची हत्या करून त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ट्रकच्या केबिनमध्येच ठेवला होता. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे करीत आहेत.

राऊत हे सोमवारी 11 वाजेपर्यंत पत्नीच्या संपर्कात होते

विजय राऊत हे 19 जानेवारी रोजी रायपूरवरून ट्रक घेऊन निघाले होते. तेव्हा ते मोबाईलवरून पत्नीच्या संपर्कात होते. दुसऱ्या दिवशी २० जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ते कारंजा येथे नाश्ता करण्यासाठी थांबल्याची माहिती पत्नीला दिली होती. मात्र, दुपारी 2 नंतर पत्नीने वारंवार फोन करूनदेखील विजय राऊत यांनी फोन उचलला नाही.

ट्रकचालक-मालक संघटनेमुळे उघडकीस

ट्रकचालक-मालक संघटनेचे गोपीनाथ डोंबाळ यांना बुधवारी पहाटे झाल्टा फाटा येथे एक ट्रक बेवारस असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती संघटनेच्या परमेश्वर गव्हाणे आणि बापूराव शिंदे यांना कॉल करून सांगितली. माहिती मिळाल्यानंतर ते दोघे आडगाव फाटा येथे आले. त्यांनी ही बाब संघटनेला सांगितल्यावर ट्रक करोडी येथील संघटनेच्या कार्यालयात लावण्यास सांगण्यात आले. त्यामुळे परमेश्वर आणि बापूराव हे दोघे ट्रक घेऊन जात असताना ट्रकमधील उग्र वासाने त्यांना उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांनी ट्रकची केबिन तपासली असता त्यात विजय राऊत यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.