मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दीड महिन्यापासून हुलकावणी देणारा कृष्णा आंधळे याला पोलिसांनी ‘वॉण्टेड’ घोषित केले आहे. कृष्णा आंधळेला शोधून देणारास बक्षीस देण्याची घोषणाही पोलिसांनी केली आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सूर्यवंशीसह नऊ जणांना ‘मकोका’ लावण्यात आला. नऊ पैकी आठ आरोपी गजाआड असून कृष्णा आंधळे मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. कृष्णाच्या शोधासाठी पोलिसांनी कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अख्खा देश पालथा घातला, पण कृष्णा हाती न लागल्याने पोलिसांना हात हलवत परत यावे लागले.
वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी
सीआयडीने तपास पूर्ण झाल्याचे सांगितल्यामुळे विशेष न्यायालयाने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराड याची आज 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. कोठडी संपल्यामुळे वाल्मीकला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला सर्दी, ताप तसेच खोकला असून उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. अमोल जोगदंड यांनी दिली.