शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी राज्यभरात विविध उपक्रम, शक्तिस्थळावर निष्ठावंतांची वारी

ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार आणि अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 99व्या जन्मदिनी उद्या राज्यभरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांची वारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील शक्तिस्थळावर येऊन नतमस्तक होणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे तमाम शिवसैनिकांचे दैवतच! शिवसेनाप्रमुखांनीच मराठी माणसाच्या मनात ज्वलंत हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन म्हणजे शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रम आयोजित करून त्यांना अनोखे वंदन केले जाते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील शक्तिस्थळ म्हणजे शिवसैनिकांना अखंड ऊर्जा देणारे श्रद्धास्थान असून या ठिकाणी राज्यभरातून शिवसेनाप्रेमींचे जथेच्या जथे सकाळपासून दिवसभर दाखल होत असतात. या वर्षीदेखील मोठय़ा संख्येने शिवसैनिक शक्तिस्थळावर येणार आहेत.

समाजोपयोगी कार्यक्रमांमधून वंदन

शिवसेनाप्रमुखांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करावे अशी शिकवण लोकप्रतिनिधींना दिली. त्यानुसार शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून त्यांना वंदन केले जाते. यामध्ये रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, आधारकार्ड-पॅनकार्डसाठी मदत, गरजूंना संसारोपयोगी आणि दैनंदिन जीवनासाठी लागणाऱया वस्तूंचे वाटप यासह सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडाविषयक स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते. यंदाही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवतीर्थावर चाफ्याचा दरवळ

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त शिवतीर्थावर जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आल्यामुळे परिसर भगवामय झाला आहे. शिवाय शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या सोनचाफ्यांच्या फुलांनी शक्तिस्थळ सजवण्यात आल्याने चाफ्याचा मनमोहक दरवळ परिसरात पसरला आहे.

महापालिकेची ‘पुष्पांजली’

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त शक्तिस्थळावर गुलाब, झेंडू, रेड पॉइंटसेटिया, यलो पॉइंटसेटिया, सफेद शेवंती, सदाफुली अशा शेकडो प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांतून ही फुलांची रोपटी आणली गेली आहेत.