पालकमंत्री पदावरून मिंधे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्येही वाद असल्याचे आज चव्हाटय़ावर आले. रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांकडून आंदोलने केली जात आहेत. रस्त्यावर होणारी ती आंदोलने सरकारसाठी योग्य नाहीत, एकनाथ शिंदे यांनी ती रोखावी असा सल्लावजा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मिंधे गटाकडून होत असलेल्या आंदोलनांबाबत भाष्य केले. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनीही गिरीश महाजन यांच्या नावासाठी आग्रह धरत आंदोलने केली होती. ती आम्ही रोखली, आता रायगडमधील रस्त्यावरील आंदोलने त्या गटाचे प्रमुख या नात्याने शिंदे यांनी रोखली पाहिजेत असे बावनकुळे म्हणाले.